सुगंधाचा व्यवसाय १० हजार कोटींचा टप्पा गाठणार- असोचेम

मुंबई, दि. २१ – देशातील पारंपरिक व सध्या आधुनिकतेचा साज चढविलेला सुगंध व्यवसाय सध्याच्या वेगाने वाढत राहिल्यास २०१५ पर्यंत १० हजार कोटी रूपयांचा टप्पा गाठेल, असा अंदाज ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (असोचेम) या संघटनेने व्यक्त केला आहे. ‘डोमेस्टिक फ्रेग्रंस इंडस्ट्री ,दि वे अहेड’ या अहवालात सध्या हा व्यवसाय तीन हजार ७०० कोटी रूपयांचा असल्याचे नमूद केले आहे. या अहवालानुसार सुगंध व्यवसायात डिओडरंट, अत्तरे व रोलऑन यांचा समावेश आहे.

भारतीय डिओडरंट व रोलऑन यांची बाजारपेठ सध्या १८०० कोटी रूपयांची असून, यात दरवर्षी ५५ टक्के वाढ होत आहे. त्याचवेळी  अत्तरांची बाजारपेठ सध्या १५०० कोटी रूपयांची असून, यात दरवर्षी ३० टक्के वाढ होत आहे. रोलऑनची बाजारपेठ सध्या ४०० कोटी रूपयांची आहे. यामध्ये अत्यंत कमी ब्रॅण्ड बाजारात असल्यामुळे रोलऑनच्या बाजारपेठेची वाढ धीम्या गतीने होत आहे. दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकांच्या शहरांतून सुगंधाना असणारी वाढती मागणी हे देशातील सुगंधाचा व्यवसाय वेगाने वाढण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे केवळ महानगरांतून सुगंधांचे विविध प्रकार विकणार्‍या कंपन्यांनी आता आपले लक्ष दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाच्या शहरांवर केंद्रित करण्यात सुरूवात केली आहे. या क्षेत्रात ३० टक्के व्यवसाय हा असंघटित आहे.

भारतीय सुगंध बाजारपेठेत ६० टक्के सुगंध हे पुरूषांसाठी असल्याचे आढळते. या गटात सतत नव्या सुगंधांचा व्यवसायही जोरात सुरू आहे. स्त्रियांसाठी तुलनेने कमी सुगंध बाजारात उपलब्ध असले तरी यामध्ये उत्तरोत्तर वाढ होताना दिसत आहे. वयात येणार्‍या मुला-मुलींकडूनही सुगंधाची मोठया प्रमाणावर खरेदी होते. शहरांमध्ये ५०० ते दोन हजार रूपये किमतींची सुगंधी उत्पादने ही पिढी विकत घेते. यात डियोडरंट व रोलऑनला अधिक मागणी असते. विशेषतः या दोन्ही प्रकारच्या सुगंधांची खरेदी मार्च ते सप्टेंबर या काळात अधिक होताना दिसते. विशेषतः सागरी किनारपट्टीजवळच्या शहरांतून डिओडरंटची विक्री जोरदार होते, असेही निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

Leave a Comment