मनसे करणार विकास दळवींचा सत्कार

मुंबई दि.२१- वानखेडे स्टेडियमवर बॉलिवूड अभिनेता शाहरूख याला खेळपट्टीवर जाण्यास रोखणारे सुरक्षा रक्षक विकास दळवी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केले आहे.

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरूख आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील या वर्षातील सर्वात खळबळजनक हाणामारी नुकतीच पार पडली आहे. त्यात मुंबई क्रिकेट असो.ने शाहरूखला वानखेडेवर पाच वर्षे प्रवेश बंदी घातली आहे. या प्रसंगात शाहरूखला रोखणारे सुरक्षा रक्षक विकास दळवी कांहीसे उपेक्षित राहिले होते. मात्र मनसेने त्यांची दखल घेतली असल्याचे दिसत आहे.

मनसेचे दक्षिण मुंबई विभागाचे अध्यक्ष अरविंद तावडे म्हणाले की दळवी यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले आहेच पण आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत तो या वादावादीत त्यांनी आपला मराठी बाणा सोडला नाही याच्यासाठी. शाहरूखच्या इंग्रजीतील शिवीगाळीला दळवी यांनी मराठीतच जबाब दिला आहे. मराठी माणसाने हे जे धैर्य दाखविले आहे त्याचे सत्कार हे कौतुक आहे.

ही घटना घडली आमच्या भागात. त्यामुळे तेव्हापासूनच आम्ही दळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो मात्र ते भेटू शकले नव्हते. अखेर मुंबई क्रिकेट असो.च्या लोकांच्या सहाय्याने त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. दळवी सध्या मुंबईबाहेर असून ते ९ जूनला मुंबईत परतणार आहेत. लालबागचे रहिवासी असलेल्या दळवी यांचे मनसे नेत्यांशी बोलणे झाले आहेच.
 
दळवी यांनी असे सांगितले आहे की मी माझे काम बजावले आहे. केवळ शाहरूख सेलिब्रिटी असल्यामुळे त्याला जादा प्रसिद्धी मिळाली. पण शाहरूखच्या जागी अन्य कोणीही असते तरी मी हेच केले असते. मनसेचा सत्कार स्वीकारायचा का कसे याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनच निर्णय घेईल असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment