नवी दिल्ली दि.२१-आरूषी तलवार आणि हेमराज दुहेरी खून खटल्यातील आरोपी व आरूषीची आई नुपूर तलवार यांनी मुलगी दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नुपूर तलवार या दंतवैद्य असून सध्या दसना तुरूंगात आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांचे पती राजेश तलवार हेही या खून प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. आरूषी या आपल्या चौदा वर्षाच्या मुलीचा खून केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
नुपूर यांना पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना देऊनही त्या हजर न झाल्याने अखेर सीबीआय विशेष न्यायालयाला त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्या सीबीआयच्या विशेष न्यायालयापुढे हजर झाल्या होत्या. सध्या त्या दसना येथील तुरूंगात असून त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी २२ मे रोजी होणार आहे. ही सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नुपुर आत्ता ज्या तुरूंगात आहेत, त्याच तुरूंगात असलेल्या महिला कैद्याच्या लहान मुलीला दत्तक घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यात अनेक अडचणी असून नुपूर स्वतः तुरूंगातून बाहेर आल्यानंतरच याबाबतीत कांही होऊ शकेल असे संबंधित अधिकारी सांगत आहेत. नुपूर आणि त्यांचे पती राजेश यांच्यावर आरूषीच्या खुनाचा आरोप असून त्यांच्या नॉइडा येथील राहत्या घरातच आरूषीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती तर त्यांचा नोकर हेमराज याचा मृतदेह दुसरे दिवशी घराच्या टेरेसवर सापडला होता. १६ मे २००८ रोजी हे हत्याकांड घडले होते.