पुढील वर्षी साहित्य संमेलन चिपळुणमध्ये आणि नाट्य संमेलन बारामतीत

पुणे, दि. २० – आगामी ८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोकणातील चिपळूण येथे होणार आहे. तब्बल २२ वर्षांनी कोकणमध्ये संमेलन होत असून, चिपळूण शहराला प्रथमच साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये हे संमेलन होईल.
    अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये झाली. त्यामध्ये महामंडळाच्या स्थळ निवड समितीच्या अहवालावर चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. कोकणात यापूर्वी १९९० मध्ये साहित्य संमेलन झाले होते. ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक या संमेलनाचे अध्यक्ष होते.
    प्रा. उषा तांबे म्हणाल्या, ८६ व्या साहित्य संमेलनासाठी कराड येथील चौफेर संस्था, चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालय आणि विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा अशी तीन निमंत्रणे आली होती. गेल्या २२ वर्षांत कोकणामध्ये साहित्य संमेलन झालेले नाही. त्याचप्रमाणे निमंत्रक संस्था असलेल्या चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालयाला पुढील वर्षी दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे चिपळूण येथे संमेलन घ्यावे अशी शिफारस स्थळ निवड समितीने महामंडळासमोर ठेवली. त्यावर महामंडळाच्या बैठकीमध्ये एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
    या संमेलनासाठी महामंडळाची मार्गदर्शक समिती तयार करण्यात आली असून त्यात प्रा. उषा तांबे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, प्रा. गुरुनाथ दळवी, सुरेश नाईक, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. दादा गोरे आणि प्रकाश एदलाबादकर यांचा समावेश आहे. यामध्ये स्वागत समितीच्या तीन सदस्यांचादेखील समावेश असेल.
    साहित्य संमेलन स्वयंपूर्ण व्हावे, या उद्देशातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने महाकोश करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या महाकोशामध्ये आतापर्यंत ७७ लाख ६६ हजार रुपयांचा निधी संकलित झाला असल्याची माहिती प्रा. उषा तांबे यांनी दिली.
    प्रा. उषा तांबे म्हणाल्या, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कराड येथे साहित्य संमेलन व्हावे अशी कराडवासियांची इच्छा होती. मात्र, दहा वर्षांपूर्वीच कराड येथे संमेलन झाले आहे. कोकणामध्ये गेल्या २२ वर्षांत संमेलन झालेले नाही ही बाब महामंडळाने ध्यानात घेतली. यशवंतराव हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना कराडपुरते मर्यादित ठेवू नये. आगामी साहित्य संमेलनात यशवंतरावांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा परिसंवाद घेण्याबरोबरच संमेलन नगरीला त्यांचे नाव देता येईल का, याविषयी विचार सुरू आहे. यशवंतरावांच्या जन्मशताब्दीची जाणीव नक्कीच महामंडळाला आहे.