स्टेट बँकेला ४,०५०.२७ कोटी रूपयांचा नफा

नवी दिल्ली, दि. १८ – स्टेट बँक ऑफ इंडियाला चौथ्या तिमाहीत ४,०५०.२७ कोटी रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला २०.८८ कोटी रूपयांचा नफा झाला होता.
    जानेवारी-मार्च २०१२ तिमाहीत बँकेला ३३,९५,९५४ कोटी रूपयांचे एकूण उत्पन्न मिळाल्याचे स्टेट बँकेने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले. गेल्यावर्षी या तिमाहित बँकेला २६,५३,६८४ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते.
    त्यामुळे बँकेने २०११-१२ या आर्थिक वर्षांसाठी समभागधारकांना १० रूपये मूल्य असलेल्या समभागांवर ३५ रूपये लाभांश देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. २०११-१२ या आर्थिक वर्षादरम्यान बँकेच्या निव्वळ नफ्यात ४१.६ टक्क्यांनी वाढ झाली. तसेच बँकेचे एकूण वार्षिक उत्पन्न १,२०,८७२.९० कोटी रूपयांवर पोहोचले. गतवर्षी हे उत्पन्न ९७,२१८.९६ कोटी रूपये होते. एसबीआय समुहाचे एकूण वार्षिक उत्पन्न ४४ टक्क्यांनी वाढले आहे.