गोवा पंचायत निवडणूक मतमोजणी पूर्ण, १८४ पंचायतींचे निकाल जाहीर

पणजी, दि.१९ मे – राज्यातील सर्व १८४ पंचायतींचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकीत राज्यभरातून अनेक नवे चेहरे निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या निकालाबाबत आनंद व्यक्त करताना, निवडून आलेले ८० टक्के उमेदवार हे भाजपा समर्थक असल्याचे म्हटले आहे. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी सुमारे ४० टक्के कॉंग्रेस समर्थक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे.
    यंदाची ही पंचायत निवडणूक कधी नव्हे इतकी चुरशीची झाली. निवडून आलेल्यांमध्ये २५ ते ३५ वयोगटातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यभरात १३ ठिकाणी मतमोजणी सुरू होती. गुरूवारी रात्री उशीरा ही मतमोजणी पूर्ण झाली. १३ ठिकाणी २१ सभागृहांमधून सुमारे १ हजार कर्मचार्‍यांनी मिळून ही मतमोजणी केली. राज्यात यावेळी ८०.१२ असे विक्रमी मतदान झाल्याने या निवडणुकीतून चुरस स्पष्टपणे दिसून आली होती. मतमोजणी सुरू असताना पणजीच्या भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून जल्लोष केला. या उलट कॉंग्रेस भवनात मात्र शांतताच होती.
    विशेष म्हणजे, ४ जून रोजी पोटनिवडणूक होणार्‍या कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघातील कासावली पंचायत क्षेत्रात दिवंगत माथानी साल्ढाणा समर्थक गटाने घवघवीत यश मिळवले आहे. तर या निवडणुकीत उमेदवार असलेले कॉंग्रेसचे रेमंड डिसा व युगोडेपाचे रमाकांत बोरकर हे दोघेही पंचायत निवडणुकीत विजयी झाले आहेत. माथानी यांच्या पत्नी अलिना भाजपकडून पोटनिवडणूक लढविणार आहेत.

Leave a Comment