कुटुंब टिकले पाहिजे

जगामध्ये काही पुरातन संस्कृती नावाजलेल्या होत्या, त्यात भारतीय संस्कृतीही होती आणि ग्रीक संस्कृतीचाही बराच गवगवा होता. मानवतेच्या इतिहासात झालेल्या निरनिराळ्या उलाढाली आणि घटनांमुळे ग्रीक संस्कृती लयाला गेली, भारतीय संस्कृती मात्र टिकली.

ग्रीक संस्कृतीच्या पाईकांनी आपल्या संस्कृतीचा असा अंत का झाला याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना असे आढळले की, आपल्या देशातली कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली म्हणून आपली संस्कृती लयाला गेली आणि भारतीय संस्कृती टिकली ती भारताने कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवली म्हणून. हे पाहिले म्हणजे कुटुंब व्यवस्थेचे महत्व लक्षात येते. म्हणूनच काल जगभरामध्ये कुटुंब दिन साजरा करण्यात आला.

या दिवसाचे औचित्य साधून विविध वृत्तपत्रांनी एकत्र कुटुंबांचा गौरव करणारे मजकूर प्रसिद्ध केले. त्यातली काही कुटुंबे ३०-४० लोकांची होती, तर काही कुटुंबांमध्ये ६० ते ७० लोक होते. अशी कुटुंबे एकत्रित ठेवणे हे मोठे कठीण काम आहे. परंतु तरी सुद्धा कोणी तरी एका खंबीर माणसाने ही कुटुंबे एकत्रित ठेवलेली आहेत. म्हणून त्यांचाही गौरव करण्यात आला.

सध्या आपल्या देशामध्ये आपल्या जुन्या परंपरा, धार्मिक रूढी, देवलसी वृत्ती इत्यादींचे उदात्तीकरण करण्याची एक लाट आलेली आहे. त्यामुळे आपल्या सार्‍याच जुन्या परंपरा छानच होत्या, असा समज निर्माण होत आहे. त्याच भावनेतून या एकत्र कुटुंबांचा गवगवा करण्यात आला. खरे म्हणजे कालचा दिवस हा कुटुंब दिवस होता, एकत्र कुटुंब दिवस नव्हता. मात्र आपण कुटुंबांचा गौरव करण्याच्या ऐवजी एकत्र कुटुंबांचाच गौरव केला. त्यातून समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती चांगली असते असा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपल्या समाजातल्या आणि धर्मातल्या काही रूढी, परंपरा या चांगल्या आहेत ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यामुळे सगळ्याच रूढी, परंपरा चांगल्या समजून आपण त्यांचा गौरव करायला लागलो तर आपल्या प्रगतीत बाधा आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा एकत्र कुटुंबाचा असा गौरव करताना थोडा सावधपणेच केला पाहिजे. कुटुंब एकत्र असले म्हणजे खर्चात बचत होत असेल, पण या कुटुंब पद्धतीचे अनेक दोष आहेत. विशेषत: आपण आज जी जीवन पद्धती स्वीकारलेली आहे त्या जीवन पद्धतीशी एकत्र कुटुंब पद्धती ही पूर्णपणे विसंगत आहे.

एकत्र कुटुंब पद्धती एकेकाळी भारतात होती, पण ती आता जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. आपण विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारलेली आहे. किंबहुना आपल्याला ती स्वीकारावी लागलेली आहे. मात्र ती स्वीकारल्यामुळे आपले अनेक फायदे झालेले आहेत. एकत्र कुटुंबात एका व्यक्तीच्या नजरेच्या धाकात सर्वांना रहावे लागते आणि व्यक्तीच्या विकासाला खूप मर्यादा येतात. हा या कुटुंब पद्धतीचा मोठा दोष आहे. या ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धतीला विरोध करताना आम्हांस कुटुंब पद्धतीला विरोध करायचा नाही हे थोडे सूक्ष्मपणे समजून घेतले पाहिजे.

कुटुंब पाहिजेच, कुटुंब व्यवस्था पाहिजेच, परंतु चुलत भावंडे, काका-पुतणे, आज्या-आजोबा, अशा ५०-५० माणसांची कुटुंबे नकोतच. आई-वडील, आजी-आजोबा आणि नातवंडे एवढेच कुटुंब आदर्श, आटोपशीर आणि व्यक्तीच्या विकासाला चालना देणारे असते. अशा कुटुंबांची मात्र गरज आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अनेक वंशांचे लोक राहतात. मात्र या लोकांमध्ये सर्वाधिक समाधानी, बुद्धीमान आणि मानसिक-दृष्ट्या संतुलित कोण आहे याचा शोध घेतला असता भारतीय लोक सर्वात समाधानी, संतुलित आणि बुद्धिमान असल्याचे लक्षात आले. या भारतीयांच्या या गुणांचा शोध घेऊन विश्‍लेषण केले असता त्यांच्या या गुणांमागे त्यांची कुटुंब व्यवस्था असल्याचे लक्षात आले.

भारतीय लोकांनी कुटुंब व्यवस्था जतन केली आहे म्हणून ते समाधानी जीवन जगू शकतात. मूळ अमेरिकन आणि ब्रिटीश लोक मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही तेवढे समाधानी नाहीत. याचे कारण या समाजाने आपली कुटुंब व्यवस्था टिकवलेली नाही हे आहे. या लोकांमध्ये घटस्फोट, आई-वडिलांविना कुटुंबे यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आज या देशांत कुटुंब व्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. जागतिक कुटुंब दिवस पाळण्याची कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे. अमेरिकेमध्ये जसे घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे तसे भारतात सुद्धा वाढत चालले आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी याची आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. मुंबईच्या कुटुंब न्यायालयामध्ये दररोज सरासरी १० घटस्फोटाचे अर्ज दाखल व्हायला लागले आहेत. याचा अर्थ अमेरिकेतल्या भोगवादी संस्कृतीचे लोण भारतातही पसरत चालले आहे. भारतीयांनी या गोष्टीची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. ती न घेतल्यास भारतात सुद्धा कुटुंब व्यवस्था मोडकळीस येईल आणि त्यातून आज अमेरिकेला भेडसावत असलेले सामाजिक प्रश्‍न भारताला सुद्धा भेडसवायला लागतील. परिणामी आपल्याला सुद्धा कुटुंब व्यवस्था मोडली म्हणून संस्कृती लयाला गेली असे नाईलाजाने म्हणण्याची वेळ येईल.

Leave a Comment