मध्य वैतरणा प्रकल्पास नाना शंकरशेठ नाव द्यावे – राहुल शेवाळे

मुंबई, दि. १८ – आधुनिक मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणारे कै. जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांचे नाव नव्याने उभारण्यात आलेल्या मध्य वैतरणा धरणास द्यावे, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे केली आहे.
    केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू शहर पुनर्विकास अभियानांतर्गत मुंबई महापालिकेने मुरबाड तालुक्यात (जिल्हा ठाणे) असलेले मध्य वैतरणा हे धरण बांधून पूर्ण केले. येत्या ऑक्टोबरपासून या धरणातून मुंबईकरांना रोज ४५५ दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. अशा या भव्य प्रकल्पास मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांचे नाव दिल्यास त्यांची स्फूर्ती चिरंतन राहून, युवा पिढीस सतत प्रेरणा देत राहील, असे शेवाळे यांनी महापौरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
    नानांनी मुंबईत स्त्री शिक्षणाचा प्रसार, औद्योगिक व आर्थिक क्षेत्रात क्रांती, शैक्षणिक जडणघडण आदी विषयांमध्ये मोठे काम केले. यातूनच संपूर्ण देशाला अभिमान वाटणार्‍या आधुनिक मुंबई महानगरीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळे मध्य वैतरणा धरणास `जगन्नाथ शंकरशेठ सागर’ असे नाव देण्याची मागणी केली.