मध्य वैतरणा धरण प्रकल्प पूर्ण

मुंबई, दि. १७ – पाणी समस्येने हैराण मुंबईकरांना एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांची पाण्याची तहान भागविण्यासाठी केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत महापालिका राज्य सरकार यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील मोखाडा येथे हाती घेण्यात आलेल्या मध्य वैतरणा धरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. यंदाच्या पावसाचे पाणी धरणात साठवून ऑक्टोबरपासून मुंबईकरांना ४५५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जाणार आहे.
    मुंबईला सध्या मोडक सागर, तानसा, वैतरणा, विहार, तुळशी, भातसा या सहा धरणांतून रोज ३ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र, आज मुंबईची लोकसंख्या १.५० कोटीपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. परिणामी, मागणी किमान ४५०० दशलक्ष लिटरवर पोहोचली असून होणारा उपलब्ध पाणी पुरवठा लक्षात घेता मुंबईला पाणी टंचाई भेडसावत आहे.
    मुंबईची तहान भागविण्यासाठी मध्य वैतरणा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. १८ ऑगस्ट २००९ रोजी केंद्रीय नगरविकास मंत्री डॉ. जयपाल रेड्डी यांच्या हस्ते शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व तत्कालीन महापौर शुभा राऊळ यांच्या उपस्थितीत भांडूप संकुल येथे भूमिपूजन करण्यात आले होते. सुरूवातीला १२०० कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प केवळ केंद्र सरकार व पर्यावरण खाते यांच्या मंजुरीसाठी ११ वर्षे रखडला.
    तसेच, मोखाडा येथे ज्या ठिकाणी हे धरण उभारण्यात आले. तेथील १.७५ लाख झाडांची कत्तल करून तेवढीच झाडे बीड जिल्ह्यात लावण्यात आली. झाडांसाठी पालिकेने सरकारला ९० लाख रूपये चुकते केले होते. हा प्रकल्प डिसेंबर २०१२ पर्यंत पूर्ण करायचा होता. परंतु, रात्रंदिवस काम करून हा प्रकल्प मे २०१२ मध्ये पूर्ण करण्यात आला.
    मध्य वैतरणा धरण पूर्णतः सिमेंट कॉंक्रीटचे बांधण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अशा प्रकारचे हे पहिले तर भारतातील दुसरे व जगातील नववे धरण आहे. या धरणाची उंची १०२ मीटर आहे. या धरणासाठी येथील ४४ बाधित कुटुंबांचे पालिकेने पुनर्वसन केले आहे.
    या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी ११ वर्षे व प्रत्यक्ष कामाचा कालावधी आणि लोखंड, सिमेंटचे वाढलेले दर, वाहतूक खर्च, मजुरी आदी कारणांमुळे या प्रकल्पाचा खर्च १२०० कोटी रूपयांवरून १७०० कोटी रूपयांवर पोहोचला.
    मध्य वैतरणा धरणाचे व धरणातील पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईनचे कामही पूर्ण झाले असून, आता ऑक्टोबरपासून या धरणाचे पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यात काही प्रमाणात वाढ होणार असली तरी मुंबईची तहान भागविण्यासाठी अद्यापही गारगाई, पिंजाळ, दमणगंगा हे पाणीप्रकल्प जलदगतीने उभारणे आवश्यक आहेत.

Leave a Comment