भारताची बाजारपेठ पुन्हा कब्जात घेण्याचा मर्सिडीज बेंझचा निर्धार

पुणे दि.१७- भारताची बाजारपेठ पुन्हा काबीज करण्यासाठी मर्सिडीझ बेंझने सर्व शक्ती पणाला लावली असून याच योजनेचा एक भाग म्हणून येत्या कांही वर्षात कंपनी ८ ते ९ नवीन मॉडेल्स बाजारात आणत आहे. या गाड्या स्पर्धात्मक किमतीत ग्राहकांना देता याव्यात म्हणून आयात न करता पुण्याच्या प्लाँटमध्येच बनविण्याचा कंपनीचा विचार आहे.
   जर्मन कारमेकर मर्सिडीज बेंझच्या मर्सिडीज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पीटर हॉनेग याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की कंपनीने मंगळवारी थर्ड जनरेशनची एमएल क्लास गाडी बाजारात आणली असून तिची किमत ५६ ते ६० लाख रूपये आहे. कंपनी सी, ई व एस कलास श्रेणीतील गाड्याही बाजारात आणत आहे. या गाड्या आयात केल्या तर ११० टक्के आयात कर भरावा लागतो. पण भारतात असेंबल केल्या तर हाच कर ३० टक्के पडतो. म्हणून कंपनीच्या चाकण प्रकल्पात या गाड्या असेंबल केल्या जाणार आहेत.
  येत्या कांही वर्षात भारतात जीएल क्लास, बी क्लास व ए क्लास गाड्याही असेंबल करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी असेंबल लाईन व पेंट शॉपवर ३५० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षात एमएल श्रेणीतील ५०० गाड्या विक्रीचे कंपनीचे उदिष्ट असून पैकी १०० बुकींग झाली आहेत.
 दुसर्‍या नंबरची कंपनी असलेल्या ऑडीशी मर्सिडीजला टक्कर द्यावी लागते आहे. मात्र भारतीय बाजारपेठेत मर्सिडीजला चांगली मागणी आहे.२०११ मध्ये बीएम डब्ल्यूने त्यांच्या ९४०० गाड्या विकल्या, मर्सिडीजने ७४३० गाड्या विकल्या तर ऑडीने ५५११ गाड्या विकल्या आहेत.

Leave a Comment