
मुंबई, दि. १८ – मंत्रीमंडळाच्या बैठकीत १५ दुष्काळी तालुक्यांना विशेष निधी म्हणून प्रत्येकी १० कोटी रूपये देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय म्हणजे राजकीय पक्षपातीपणा असून ज्या तालुक्यांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असेल अशा सर्व तालुक्यांना विशेष निधी द्यावा, अशी मागणी शुक्रवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटून केली. त्याचबरोबर सिंचन क्षेत्रातील वस्तुस्थिती सर्वांसमोर येण्यासाठी सिंचनासंदर्भात लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढावी आणि राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, असे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांना सुचविले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल डॉ. डी. के. शंकरनारायणन् यांची शुक्रवारी भेट घेतली. राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती असताना राज्य सरकारने या बाबतीत कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांचे विजेचे कनेक्शन देखील कापण्याची कारवाई सरकारने सुरू केली आहे, अशी माहिती यावेळी राज्यपालांना देण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
