टाटा वीज कंपनीला ‘बेस्ट’ चा शॉक

मुंबई, दि. १५ – टाटा वीज कंपनीला बेस्ट उपक्रमाच्या हद्दीत वीज पुरवठा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सद्यस्थितीत मनाई केली आहे. त्यामुळे टाटा कंपनी आता बेस्टच्या हद्दीत वीज पुरवठा करू शकणार नाही.
    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाद्वारे बेस्टने टाटा वीज कंपनीला एक प्रकारे शॉक दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने टाटा वीज कंपनीस स्वतःचे वीज वितरण जाळे बेस्ट उपक्रमाच्या शहर हद्दीत वाढविण्यास अलिकडेच परवानगी दिली होती. त्यामुळे आधीच तोट्यात चाललेल्या बेस्ट उपक्रमांचे अस्तित्वच धोक्यात आले होते. टाटा वीज कंपनीने वीज पुरवठा केल्यास बेस्टचा वीज विभाग व परिवहन विभागही बंद पडू शकतो. सदर प्रकरणी प्राधिकरण नवी दिल्ली यांनीही टाटा वीज कंपनीस बेस्टच्या क्षेत्रात वीज पुरवठा करण्यास मान्यता दिल्याने बेस्टने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने १० मे, २०१२ रोजी बेस्टची याचिका दाखल करून घेतली. त्यानंतर उभय पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे याप्रकरणी अंतिम निर्णय लागेपर्यंत ‘बेस्ट’ला दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment