क्रिकेटपटू मोना मेश्राम हिंदुस्थानी संघात

नागपूर, दि.१६ – व्हॉलीबॉल खेळात प्राविण्य मिळविल्यानंतर नागपूरच्या मोना मेश्राम हिने हिंदुस्थान क्रिकेट संघात स्थान मिळवून नागपूरकरांच्या शिरपेचा नवा तुरा रोवला आहे. क्रिकेटमध्ये पाच वर्षे मेहनत केल्यानंतर अखेर भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळाल्याने तिला मेहनतीचे फळ मिळाले. मिताली राजच्या नेतृत्त्वात जून-जुलैत इंग्लंड दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय संघात २१ वर्षीय मोनाला स्थान देण्यात आले.
    इंदूर येथे महिला निवड समितीची बैठक पार पडली. त्यात १५ सदस्यीय संघ निवडण्यात आला. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध दोन टी-२० आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार आहेत. निवड झाल्याने अतिशय आनंदी आहे, मात्र मेहनतीचे फळ मिळाले, असे वाटत नाही. कारण अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळाल्यानंतर धावा काढीन त्याचवेळी मेहनतीचे फळ मिळाले, असे म्हणता येईल, अशी प्रतिकि‘या मोनाने दिली. निवड झाल्याने अतिरिक्त दबाव असल्याचा मुद्दा तिने खोडून काढला. ती म्हणाली, दबाव घेण्याचा प्रश्‍नच येत नाही.
    मार्चमध्ये भारताच्या दौर्‍यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध तिने अहमदाबाद येथे सराव सामन्यात २९ धावांची संयमी खेळी केली होती. त्यामुळे निवड समितीचे सदस्य प्रभावित झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून ती महिला चॅलेंजर स्पर्धेतही खेळत आहे. तिला बीसीसीआयतर्फे ज्युनियर महिला क्रिकेटपटू म्हणूनही सम्मानित करण्यात आले आहे.

Leave a Comment