महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन बॅटसमनला अटक

 नवी दिल्ली दि.१८- आयपीएल स्पर्धेतील कालच्या सामन्यात विजयी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघातील ऑस्ट्रेलियन बॅटसमन ल्यूक पॉमर्शबॅश याला दिल्ली पोलिसांनी आज सकाळी अटक केली. काल रात्री झालेल्या पार्टीत एका अमेरिकन महिलेचा विनयभंग केल्याचा व तिच्या प्रियकराला मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
   यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दररोज नवीन कांही तरी नाट्य घडते आहे. शुक्रवारीच बॉलिवूड अभिनेता शाहरूखचा वानखेडेवरचा धिंगाणा संपतो न संपतो तोच ही घटना घडली आहे. त्याअगोदर मॅच फिक्सिंगचे नाट्य घडले आहेच.
  या प्रकरणाची हकीकत अशी की रॉयल चॅलेंजर्सच्या विजयानिमित्त दिल्लीतील मौर्य शेरेटनमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ल्यूकने तेथे आलेल्या अमेरिकन महिलेशी गैरवर्तन केले. ती याच हॉटेलमध्ये उतरली होती व आपल्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेली तेव्हा तिच्या पाठोपाठ जाऊन ल्यूकने तिचा विनयभंग केलाच पण या प्रकारला अटकाव करू पाहणार्‍या तिच्या प्रियकराला बेदम मारहाणही केली.मारहाणीत जखमी झालेल्या या प्रियकराला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. संबंधित महिला भारतीय मूळ असलेली अमेरिकन आहे.
  संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार या घटनेची वाच्यता करू नये तसेच पोलिसांत जाऊ नये यासाठी तिच्यावर दबाव आणण्यात आला मात्र त्याला न जुमानता तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी चौकशी करून ल्यूकला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३५४,३२३,४५४,५११ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  आयपीएलचे सचिव राजीव शुक्ला यांनी मात्र या घटनेचा आयपीएलशी कांही संबंध नसल्याचे मत व्यक्त केले असून पोलिस योग्य ती कारवाई करतील असे सांगितले आहे.

Leave a Comment