
जिनिव्हा- शतकानुशतके अनेक देशातील राजे, राण्या, राजकुमार, राजकन्या यांनी अंगावर अभिमानाने मिरविलेला तसेच आपापसांतील देशातील संबंध सुरळीत राहावेत यासाठी भेट म्हणून दिलेल्या, राजेरजवाड्यांची कर्जे चुकविण्यासाठी मदतगार ठरलेल्या तब्बल ३५ कॅरेट वजनाच्या ब्युओ सॅन्सी या हिर्याचा लिलाव जिनिव्हातील आक्शन हाऊसतर्फे नुकताच करण्यात आला. या हिर्याला तब्बल ९.५७ दशलक्ष डॉलर्सची बोली मिळाली. पर्ल डबल रोज कटचा हा हिरा आहे.
भारताच्या गोलकोंडा खाणीत सापडलेला हा हिरा ऐतिहासिक महत्त्वाचा मानला जातो. युरोपच्या रॉयल फॅमिलीत चारशे वर्षांहून अधिक काळ असलेला हा हिरा रॉयल फॅमिलीच्या जीवनात आलेल्या अनेक चढउतारांचा साक्षीदार आहे. सन १५०० मध्ये कॉन्स्टेंटिनोपलचा निकोलस डी हर्ले,-लॉर्ड ऑफ सॅन्सी याने हा हिरा प्रथम विकत घेतला होता. तो नंतर त्याच्याकडून फ्रेंच किंग चवथा हेन्री याने बायकोला भेट देण्यासाठी १६०४ सालात ७५ हजार लिरांना विकत घेतला. त्यानंतर हा हिरा अनेक ठिकाणी, अनेक देशांत फिरत राहिला व अखेर बर्लिन येथे दुसर्या महायुद्धानंतर ब्रिटीश ट्रूपना सापडला. नंतर तो पर्शियाला परत करण्यात आला.
या हिर्याच्या लिलावात पाच बड्या खरेदीदारांनी बोली लावली होती.पर्शियाचा राजा जॉर्ज फेडरिच याला २ ते ४ दशलक्ष डॉलर्स या लिलावातून मिळतील अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात एका अनामिकाने तो ९.५७ दशलक्ष डॉलर्सला खरेदी केला.