अमरनाथ यात्रेसंबंधी हिंदू संमेलनाचे आयोजन

जम्मू, दि. १८ – अमरनाथयात्रा येत्या ४ जूनपासूनच सुरू व्हावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे येथे रविवार, २० मे रोजी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनास विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, शंकराचार्य, वासुदेवानंद सरस्वती आदी मार्गदर्शन करणार आहेत.
   विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. एस. एल. गुप्ता यांनी या संमेलनाची पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, यंदाच्या वर्षीची अमरनाथयात्रा २५ जूनपासून सुरू करण्याचा जो निर्णय अमरनाथ देवस्थान मंडळाने घेतला आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोरा हे २००९ पासून सातत्याने अमरनाथयात्रेच्या कालावधीत कपात करून हिदूधर्मीयांच्या भावना दुखावत आहेत. हे आम्ही कदापी सहन करणार नाही.
   अमरनाथयात्रा येत्या ४ जूनपासून म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेपासून सुरू होईल. या यात्रेत सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त येत्या २ जून रोजी जम्मूमध्ये येतील. देशभरातून आलेले शिवभक्त जम्मू येथील रणवीरेश्वर मंदिरात जलाभिषेक करून राष्ट्रविरोधी शक्तींचे मनसुबे हाणून पाडले जावेत, यासाठी प्रार्थना करतील, अशी माहिती डॉ. गुप्ता यांनी दिली. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी अमरनाथयात्रेच्या संदर्भात जो कार्यक्रम घोषित झाला आहे, त्यामध्ये बदल करून या यात्रेचा प्रारंभ ४ जूनपासूनच होईल, या दृष्टीने आदेश द्यावेत. तसेच ४ जूनपूर्वी सर्व सोयीसुविधांची पूर्तता करण्याचे आदेश अमरनाथ देवस्थान मंडळाला द्यावेत, असे आवाहनही विश्व हिंदू परिषदेने राज्यपालांना केले आहे.o

Leave a Comment