राजा यांना दिलासा

    ए. राजा यांना जामीन मिळाला आहे पण त्यांच्या चाहत्यांत आणि समर्थकांत आनंद व्यक्त होत आहे. ते काही २ जी स्पेक्ट्रम प्रकरणात निर्दोष वगैरे सुटलेले नाहीत. आता त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले होते आणि त्या अनुषंगाने करावयाच्या तपासाच्या निमित्ताने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. जामिनावर मुक्तता होऊनही समर्थकांना एवढा आनंद का झाला, याचा विचार केला पाहिजे. या लोकांचा भारतीय न्यायव्यवस्थेच्या गतीवर फार विश्‍वास आहे. आता एकदाची सुटका झाली आहे. यापुढे खटला चालेल. त्या दरम्यान पुन्हा काही अटक होणार नाही आणि खटल्याचा निकाल लागेपर्यंत आता जाण्याची वेळ येणार नाही. खटला निकाली निघायला १५ ते २० वर्षेही लागू शकतात. देशातल्या अन्य अनेक खटल्यांची उदाहरणे समोर आहेत. न्यायालयीन कामकाज चालू असताना पावलोपावली हरकती आणि आक्षेप नोंदवत राहायचे. आधीच विलंबासाठी प्रसिद्ध असलेल्या या व्यवस्थेला अजून विलंब लावायला भाग पाडायचे. शेवटी कितीही विलंब लागला तरीही निकाल लागणारच. त्या निकालात शिक्षा झालीच तर तिला उच्च न्यायालयात आव्हान द्यायचे आणि तिथली याचिका निकाली निघेपर्यंत शिक्षेला स्थगिती मागायची. अशी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कोर्टबाजी करीत राहिलो की निदान २५ ते ३० वर्षे लागतात. आता ५० वर्षांचे असलेले राजा तेव्हा ७५-८० वर्षांचे होतील. मग नंतर बघता येईल काय करायचे ते. निदान आता तरी तुरुंग आणि त्यातली बंधने, एकांतवास यातून सुटका झाली आहे ना? मग आनंद मानायला काय हरकत आहे ? त्यांना कितीही आनंद झाला तरीही न्यायालयाच्या भाषेत हा तात्पुरता दिलासा आहे. आता एकदा कायद्याच्या चक्रात फिरत रहावे लागणार आहे. त्यातल्या त्यात आनंदाची बाब अशी की, आता भोवळ आणणारे हे चक्र बाहेर राहून सहन करायचे आहे. तुरुंगवास ही शिक्षा अशी असते की माणूस तिच्यातून काही तरी शिकतच असतो. तो सरळ होतो. माणसाची सर्वात मोठी गरज संवाद ही असते आणि तो संवाद तुरुंगात संपुष्टात येत असतो. त्यामुळे तुरुंगवासात माणूस सुधारतोच.  ए. राजा यांनी  १५ महिन्यात त्यांनी तिहार तुरुंगात काय काय शिक्षण घेतले आहे हे आता कळणार आहेच. हा भारतातला सर्वात मोठा तुरुंग आहे. येथे इंदिरा गांधी यांनीही एकदा वास्तव्य केले आहे. या तुरुंगात अनेक गैरसोयी होत्या. तो नरक होता. किरण बेदी यांना या तुरुंगाच्या प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते.  बेदी यांनी  या तुरुंगाच्या आमूलाग्र परिवर्तनाचे काम हाती घेतले. चरस, गांजा यांच्या विक्रीचे धंदे करणारे आणि चक्क वेश्याव्यवसाय करणारे इथले कैदी ध्यान करायला लागले आणि लोक तिहार तुरुंगाला तिहार आश्रम म्हणायला लागले. तुरुंगवासातही दोन प्रकार असतात. शिक्षा झालेले आणि कच्चे कैदी. ए. राजा यांना शिक्षा झालेली नव्हती ते कच्चे कैदी होते. ते न्यायालयीन कोठडीत होते. ते बाहेर असल्यावर साक्षीदारावर दबाव टाकतील आणि पुराव्यात फेरबदल करतील अशी भीती होती. ते बाहेर असणे तपासाच्या सोयीचे नव्हते म्हणून त्यांना आत टाकले होते. ती काही शिक्षा नव्हती. आता खटला चालणार आहे आणि या खटल्यात ते दोषी आढळले तर त्यांना शिक्षा होणार आहे. त्यांची अजून आरोपातून सुटका झालेली नाही. आताही न्यायालयाने दोन आधारावर राजा यांना जामीन मंजूर केला आहे. या खटल्यातले त्यांच्यासोबत अटकेत पडलेले अन्य १३ आरोपी आता जामिनावर मुक्त झाले आहेत. ते मुक्त झाले आहेत तर आता आरोपी क्रमांक एकला कोठडीत ठेवण्याचे काही कारण नाही असा युक्तिवाद राजा यांच्या वकिलाने केला होता. या १४ जणांतला शेवटचा आरोपी आत असेपर्यंत राजा यांनी कधीही जामिनासाठी अर्ज केला नव्हता. तेव्हा या १३ जणांना जो न्याय मिळाला तोच आपल्यालाही मिळावा अशी मागणी राजा यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली असली तरीही सीबीआयने तिला विरोध केला होता. १३ सह आरोपी सुटले असले तरीही त्यांच्यावरच्या आणि आरोपी क्रमांक एक वरच्या आरोपात फरक आहे, तेव्हा १३ जणांना लावलेला न्याय राजा यांना लावू नये असे सीबीआयच्या वकिलाने म्हटले होते. ए.राजा आणि दुबईतली एक कंपनी यांच्यातल्या संबंधाबाबत अजून काही गोष्टींचा तपास करायचा आहे, तेव्हा ते आतच असावेत असे त्यांनी म्हटले होते पण न्यायालयाने हे म्हणणे अमान्य केले आणि राजा यांची मुक्तता केली. ए.राजा पुराव्यात फेरफार करतील अशी भीती सीबीआयच्या वकिलाने व्यक्त केली होती; पण हेही म्हणणे न्यायालयाने फेटाळले. जवळ जवळ पूर्ण पुरावे आपल्या ताब्यात आहेत आणि ते कागदपत्रांच्या स्वरूपात आहेत तेव्हा त्यांनी या कागदपत्रात फेरफार करण्याचा काही प्रश्‍नच येत नाही अशी भूमिका न्यायालयाने घेतली. अर्थात राजा यांना कोठडीतून बाहेर येण्याने दिलासा मिळाला असला, तरीही न्यायालयाने त्यांना अनेक अटी घातल्या आहेत. त्याही बर्‍याच जाचक आहेत.

Leave a Comment