राजस्थानला गरज ‘रॉयल’ विजयाची

हैदराबाद, दि. १७ – राजस्थानचा संघ शुक्रवारी डेक्कन चार्जर्सशी सामना करणार आहे. गुणतालिकेत सर्वात तळाशी असलेल्या डेक्कनविरूद्ध राजस्थानला उद्याचा सामना जिंकण्यासाठी चांगलेच चार्ज व्हावे लागणार आहे. जर राजस्थानला बाद फेरीत पोहचायचे असेल तर उद्याच्या सामन्यात विजयाशिवाय पर्याय नाही. राजस्थानने आतापर्यंत झालेल्या सामन्यांत १४ गुणांची कमाई केली आहे. जर राजस्थानला प्ले-ऑफ लढवीत आपले स्थान निश्चित करायचे असेल तर उद्याचा सामना आणि रविवारी होणारा मुंबई विरूद्धचा सामनाही त्यांना मोठ्या फरकाने जिकावा लागणार आहे. डेक्कन चार्जर्स या आधीच स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली आहे. उर्वरित सामन्यांमध्ये आपला खेळ सुधारण्याची संधी त्यांच्याकडे आहे. राजस्थानने पुण्याला गेल्या सामन्यात ४५ धावांनी नमवले होते. उद्याच्या सामन्यात विजयासाठी त्यांना आपला खेळ उंचवावा लागणार आहे. राजस्थानच्या फलंदाजीबाबत सांगायचे झाले तर रहाणे आणि द्रविडची जोडी या हंगामात कमाल करीत आहे. त्यासोबत ऑस्ट्रेलिअन ब्रैड हॉज, शेन वॉटसन आणि इंग्लंडचा ओवेस शहा सुद्धा मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. रहाणेने या हंगामात ५४१ धावा, द्रविडने ४१८ धावा, शाहने २८४ तर हॉजने २४५ धावा काढल्या आहेत. राजस्थानची गोलंदाजीही तितकीच मजबूत आहे. सिद्धार्थ त्रिवेदी आणि अमीत सिंग यांनी या हंगामात चांगली गोलंदाजी केली आहे. संघाचे फिरकी गोलंदाज जेहान बोथा आणि या हंगामातील पहिली हॅटट्रिक नोंदविणारा अजित चंडिला फलंदाजांना जखडून ठेवत आहेत.

Leave a Comment