फेडरल बँकेतर्फे तीन प्रकारची कार्डे

मुंबई, दि. १७ – ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देता यावी म्हणून, फेडरल बँकेने मास्टर कार्डच्या सहाय्याने नुकतीच तीन प्रकारची कार्डे ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहेत. या पैकी दोन डेबिट कार्डे असून, ती ‘प्रिमियम मास्टर डेबिट कार्ड व ‘मेस्टो कार्ड या नावाने उपलब्ध असतील. याशिवाय एक प्रीपेड ट्राव्हल कार्ड ‘कॅश पासपोर्ट’ या नावाने बँकेने उपलब्ध केले आहे. यामुळे या बँकेचे ग्राहक सहज व सुरक्षितपणे व्यवहार करू शकतील; तसेच ग्राहकांच्या संख्येत वाढ होईल, असा आशावाद या बँकेचे व्यवस्थापक बाळगून आहेत.
  प्रिमियम मास्टर डेबिट कार्ड हे फोटो डेबिट कार्ड असून, बँकेच्या निवडक ग्राहकांना देण्यात येणार आहे. कार्डधारकाला हे कार्ड वापरून प्रतिदिवशी दोन लाख रूपयांपर्यंतचे व्यवहार करता येईल. मेस्टो कार्डधारक प्रतिदिवशी एक लाख २५ हजार रूपयांपर्यंत व्यवहार करू शकेल. दुकानांमधून खरेदी करण्यासाठी हे कार्ड सुरक्षित असल्याचा या बँकेचा दावा आहे.
  कॅश पासपोर्ट हे प्रीपेड ट्राव्हल कार्ड आहे. परदेशी जाणर्‍यांसाठी हे उपयुक्त आहे. अमेरिकी डॉलर, ब्रिटिश पौंड व यूरो या तीन चलनांत हे कार्ड उपलब्ध आहे. हे कार्ड कोणत्याही खात्याशी संलग्न केले जात नाही. या कार्डामध्ये भारतीय चलनात रक्कम भरून पुन्हा पुन्हा ‘रिलोड’ करण्याची सोय उपलब्ध आहे. हे जगभर कोठेही स्वीकारले जाते.

Leave a Comment