नक्षलवाद्यांनी आंतरराज्य महामार्ग रोखला

गडचिरोली, दि. १७ – ग्रीन हंट ऑपरेशन बंद करा, एनसीटीसी कायदा रद्द करा, देशभरातील तुरुंगात असलेल्या निर्दोष आदिवासी लोकांची मुक्तता करा, या माणसांना घेवून माओवादी संघटनांनी एक दिवसीय भारत बंदचे आवाहन केले होते. भारत बंदच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर, गडचिरोली, धानोरा, राजनांदगाव या आंतरराज्यीय महामार्गावरची वाहतूक ११ तास ठप्प झाली होती. गडचिरोलीपासून १० किमी अंतरावरील सावरगावजवळ नक्षलवाद्यांनी बॅनर व दगड ठेवून महामार्ग बंद केला होता. काही भागातील वाहतूक सुरळीत झाली.
     यामुळे धानोराकडून गडचिरोलीकडे येणार्‍या व गडचिरोलीकडून धानोर्‍याकडे जाणारी वाहने दिवसभर थांबून होती. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे नागरिकांना अडकून पडावे लागले. बंद दरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडली नाही. मात्र, दुर्गम भागात अनेक ठिकाणी व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. धानोर, जिमलगट्टा, मुरुमगाव, रांगी येथेही या बंदचा प्रभाव जाणवला. रांगी येथे आठवडी बाजार भरला नाही. गडचिरोलीलगतच्या सावरगाव जवळ माओवाद्यांनी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा पुतळा जाळला व तेथे काही पत्रकेही वाटली.