अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपया निच्चांकी पातळीवर

मुंबई, दि. १६ – अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपयाने बुधवारी निच्चांकी पातळी गाठली आहे. यापूर्वीचा निच्चांक तोडत ६७ पैशांनी घसरून रूपया ५४.४६ वर स्थिरावला. दुसरीकडे रूपयापाठोपाठ सेन्सेक्सही कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स बुधवारी पाच महिन्यानंतर १६ हजाराखाली गेला. सेन्सेक्स ३४० अंकांनी घसरला.
     अमेरिकन डॉलरच्या बाजारातील वाढत्या मागणीमुळे रूपयाचे अवमूल्यन झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय परकीय संस्थांनी मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठेतून पैसे काढून घेतल्यामुळेही रूपयात घसरण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रूपयाचे मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन झाले आहे. १५ डिसेंबर, २०११ रोजी रूपयाने ५४.३२ ही ऐतिहासिक निच्चांकी पातळी गाठली होती. किरकोळ बाजारपेठेची अतिशय वाईट सुरूवात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे वाढलेले महत्त्व यामुळे रूपयात घसरणीची नोंद झाली आहे. रूपयाच्या अवमूल्यनाचा फटका शेअर बाजारालाही बसला आहे. त्यामुळेच बुधवारी बाजार उघडताच सेन्सेक्स २५० अंकांनी कोसळला. वाहन उद्योग, बँका, बांधकाम उद्योग, धातू इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग कोसळले.

Leave a Comment