हल्ल्याच्या धमकीमुळे वाघा सीमेवरील बंदोबस्तात वाढ

चंदीगढ, – वाघा सीमेवर असलेल्या पाकिस्तानी तपासणी चौकीवर हल्ला करण्याची धमकी लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांनी दिल्यानंतर या चौकीवरील पाकिस्तानी आणि भारतीय सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
  लष्कर-ए-तय्यबा आणि तहरीक-ए-तालिबान या दोन दहशतवादी संघटनांनी वाघा सीमेवरील पाकिस्तानचे तपासणी नाके उडवून देण्याची धमकी दिली आहे. ती लक्षात घेऊन पाकिस्तानने ही माहिती भारतासही दिली. त्यानंतर दोन्ही देशांनी वाघा सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये वाघा सीमेवरून मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो.
  दहशतवाद्यांची धमकी लक्षात घेऊन सीमा सुरक्षा दलाने आणि अमृतसर ग्रामीण पोलिसांनी वाघा सीमेवरील तपासणी चौकीचा परिसर; तसेच रोज संध्याकाळी ज्या ठिकाणी ध्वजावतरणाचा कार्यक्रम होतो, त्या भागातील बंदोबस्त आणखी कडक केला आहे.

Leave a Comment