
बंगळूरू, दि. १६ – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर सीबीआयने बुधवारी छापे टाकले. त्यामुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या खाणीत अडकलेल्या येडियुरप्पा यांनी स्वतःसह दोन मुले आणि जावयाच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
सीबीआयने बुधवारी येडियुरप्पा, त्यांची दोन मुले आणि जावयाच्या घरांवर तसेच दोन खाणकाम कंपन्यांवर छापे टाकले. अवैध खाणकामप्रकरणी येडियुरप्पा यांचा हात असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआयने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. हैदराबाद आणि बंगळूरूमधील सीबीआय अधिकार्यांनी संयुक्तरित्या छापे टाकले.
अवैध खाणकाम प्रकरणी सीबीआयने येडियुरप्पा आणि अन्य तीन जणांवर मंगळवारी एफआयआर दाखल केला. त्या पार्श्वभूमीवर सीबीआयने बुधवारी येडियुरप्पा, त्यांचा मुलगा बी. वाय. राघवेंद्र, बी. वाय. विजेंद्र आणि जावई सोहन कुमार यांच्या बंगळूर आणि शिमोगा येथील आठ निवासस्थानांवर धाडी टाकल्या. या व्यतिरिक्त सीबीआयने बेल्लारीतील जेएसडब्ल्यू स्टील आणि साऊथ वेस्ट खाणकाम कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले. या दोन कंपन्यांना अतिसूट देण्याचा आरोप येडियुरप्पांवर आहे. येडियुरप्पा यांच्या कुटुंबियांकडून चालवण्यात येणार्या चॅरिटेबल ट्रस्टला या कंपन्यांकडून देणगी दिली जात असल्यामुळे त्यांच्याबाबत येडियुरप्पा यांचे नरमाईचे धोरण स्विकारल्याचे बोलले जात आहे. याप्रकणी जेएसडब्ल्यू कंपनीने सांगितले की, ‘आम्ही कधीही कोणताही गैरव्यवहार केला नाही. तसेच आमचा कोणत्याही चुकीच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही’.
दरम्यान, पुन्हा एकदा मंत्रिपदी विराजमान होऊ पाहणार्या येडियुरप्पा यांना सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक दणका दिला आहे.