श्रीविठ्ठलमूर्ती संरक्षणाकडे मंदिर समितीचे दुर्लक्ष

पंढरपूर, दि. १७ – लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीविठ्ठलमूर्तीची झीज रोखण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने विठ्ठलमूर्तीवर वॅकर्स २९० ही रासायनिक लेपप्रक्रिया मार्चमध्ये केली होती. त्यानंतर पुरातत्व विभागाने मंदिर समितीला मूर्ती संरक्षणासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. या सूचनांचे मंदिर समितीकडून पालन करण्यात येत नसून विठ्ठलमूर्ती संरक्षणाकडे मंदिर समितीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
  संभाजीनगर येथील केंद्रीय पुरातत्व विभागाचे प्रमुख एम. सिंग व पाषाणतज्ज्ञ आर.एस.त्रिंबके यांनी विठ्ठलमूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केली होती. या कालावधीत तीन दिवस पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते. भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येत होते. मंदिर समितीने तिसर्‍यांदा विठ्ठलमूर्तीवर लेपप्रक्रिया केली आहे.
  विठ्ठलमूर्तीवर लेपप्रक्रिया केल्यानंतर मूर्तीला पुन्हा धोका पोहोचू नये, म्हणून पुरातत्व विभागाने मंदिर समितीला विठ्ठलमूर्तीवर अभिषेक करताना दही, दूध, मध, साखर, लोणी यांचा वापर करू नये, गाभार्‍यातील तापमान एकसारखे ठेवावे, गाभार्‍यात बसविण्यात आलेली ग्रेनाईट फरशी काढून टाकावी, गाभार्‍यामध्ये जास्त प्रकाशाचा वापर न करता मंद दिवे ठेवावेत, असे एका अहवालाद्वारे सुचविले होते. मूर्तीस लेप देवून दोन महिने उलटले तरी, मंदिर समितीने पुरातत्व विभागाने केलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन न करता या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment