`ये मेरा दिल प्यार का दिवाना’ आशा भोसले यांच्या शब्दावर थिरकली रविनाची पावले

पुणे, दि. १६ – वयाच्या ऐंशीव्या वर्षाकडे वाटचाल करणार्‍या आशा भोसले यांच्या चिरतरुण गळ्यातून आलेले `ये मेरा दिल प्यार का दिवाना’ हे गीत… त्यावर मस्त मस्त गर्ल रवीना टंडन हिची थिरकलेली पावले… अशी गीत-नृत्याची अनोखी मेजवानी रसिकांनी अनुभवली. मी तुमच्या घरामध्येच असते आणि नेहमीच राहीन आशाताईंनी व्यक्त केलेली भावना किती खरी आहे, याची प्रचितीदेखील त्यांना आली.  
    वरदश्री चित्रतर्फे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते आशा भोसले, अभिनेते सदाशिव अमरापूरकर, गणेश यादव, प्रतीक बब्बर, उमेश कामत, अभिनेत्री रवीना टंडन आणि तेजस्विनी पंडित यांना उमेद पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योजक धनंजय दातार आणि संस्थेचे महेश टिळेकर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
    आशाताईंनी आपल्या खास शैलीतील रसिकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, फडकेसाहेबांची (सुधीर फडके) गाणी गाण्यासाठी मी पुण्यात आले. त्याला आता साठ वर्षे झाली. पुणेकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. मी सदाशिवरावांची ’ फॅन आहे. एक मराठी माणूस हिंदी इंडस्ट्री काबीज करतो याचा मला अभिमान वाटतो. हा अभिनेता इतके सुंदर काम करतो की, त्यांची भूमिका पाहून त्यांना मारावे असे वाटते. रवीना छोटीशी होती तेव्हापासून मी त्यांच्या घरी जात आहे. प्रतीकमध्ये मला स्मिता पाटील दिसते. तो मला नातवासारखा आहे.
    सदाशिव अमरापूरकर म्हणाले,  आपले सारे जीवन राजकारणाने व्यापून टाकले आहे. एका पुस्तकातील व्यंगचित्रावरून वादळ उठले तेव्हा राजकारण्यांनी घाईगडबडीत ते पुस्तक नाहीसे केले. यशवंतरावांच्या काळात होती तशी सध्याच्या राजकारण्यांनी साहित्यिक उंची ठेवलेली नाही. सगळीकडे निर्लज्जपणा आणि घातकीपणा भरला आहे.
    सध्या फक्त चित्रपटातून काम करण्यावरच लक्ष केंद्रीत केले असल्याने राजकारणात जाण्याचा विचारदेखील केलेला नाही, असे प्रतीकने सांगितले. तर गणेश यादव याने महाभारतातील दुर्योधनाची भूमिका करायला आवडेल, अशी इच्छा प्रदर्शित केली. ज्योती चांदेकर ही माझी आईच माझ्यासाठी आयडॉल असल्याची भावना तेजस्विनी हिने व्यक्त केली.
    यावेळी सुनील तटकरे, धनंजय दातार यांनी मनोगत व्यक्त केले. महेश टिळेकर यांनी प्रास्ताविक केले. स्मिता गवाणकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment