
बंगळुरू, दि. १७ – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते बी. एस. येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सुनावणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने येत्या २५ मेपर्यंत स्थगित ठेवली आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या निवासस्थानावर सीबीआयने बुधवारी छापे घालण्यास प्रारंभ करताच येडियुरप्पा यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
बी. एस. येडियुरप्पा, त्यांचे दोन मुलगे बी. वाय. राघवेंद्र आणि बी. वाय. विजयेंद्र आणि जावई आर. एन. सोहनकुमार यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावरील सुनावणीस स्थगिती देताना न्या. शिवलिंग गौडा यांनी अर्जदारांना नेहमीच्या न्यायालयात दाद मागण्यास सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश लक्षात घेऊन केंद्रीय गुप्तचर विभागाने माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि त्यांच्या नातलगांच्या निवासस्थानी बुधवारी छापे घातले. बंगळुरू आणि शिमोगा जिल्ह्यातील ११ ठिकाणी हे छापे घालण्यात आले होते.