मंत्र्याच्या मुलाचा हल्ल्यामध्ये हात असल्याचा आरोप

नागपूर, दि. १७ – राज्यात जलसंवर्धन खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेल्या पाच दिवसांपासून करीत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या जलसंवर्धन खात्याचे मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांनी अण्णा हजारेच्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप अण्णा हजारेचे सहकारी सुरेश पठारे यांनी त्यांचे नाव न घेता आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला. अण्णा हजारे यांच्या गाडीवर दगडफेक करणार्‍या दोन युवकांना पोलिसांनी अटक केली. पण या हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या कुणाल राऊत याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही. कुणाल यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुरेश पठारे यांनी केली आहे.
 बुधवारी अण्णा हजारे यांची चिटणीस पार्क येथे सभा होती. या दरम्यान सभेकरिता स्कॉर्पिओ कारमध्ये प्रचाराची कागदपत्रे घेऊन आलेल्या कारवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. त्याचवेळी कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निर्देशने केली. हे स्पष्ट असताना पोलिसांनी कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. याप्रकरणाची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. गेल्या तीन दिवसांपासून जलसंवर्धन खात्याबाबत अण्णा हजारे आपल्या सभेमधून टीका करीत आहेत. या खात्यामध्ये गैरव्यवहार झाला असून दोन वर्षात या विभागाची बैठकच झाली नाही. याबाबत अण्णा हजारे यांनी तोफ डागल्यामुळे नितीन राऊत यांचे पुत्र संतप्त झाले. त्यातूनच त्यांनी हा हल्ला घडविला असा आरोपही त्यांनी केला आहे.
  अशा भ्याड हल्ल्यामुळे आपण घाबरत नाही. यात काँग्रेसची बदनामी आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. मी कुणाचेही नावे घेतलेली नाहीत. फक्त त्या त्या खात्यांमध्ये काय काय चालू आहे याची जनतेला माहिती दिली. या हल्ल्याचा उद्देष काय होता हेच आपल्याला समजले नाही, असे अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. अण्णा हजारे यांच्या वाहनावर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ आज राळेगणसिद्धी येथे अण्णा समर्थकांनी बंद पुकारला असून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांसोबत नगर जिल्ह्यातील युवक काँग्रेसचा नेता होता. त्याचे नाव आपण पोलिसांना सांगितले आहे. त्याच्यावरही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे पठारे यांनी सांगितले.
   अण्णा हजारे यांच्या ताफ्यातील ही गाडीही पोलिसांनी जप्त केली. सभा संपल्यानंतर रात्री १० च्या सुमारास अण्णा हजारे यांनी थेट कोतवाली पोलिस गाठले. कोतवाली पोलिसांनी तहसील पोलिस ठाण्यात गाडी नेली असल्याचे सांगितले. अण्णांनी तहसील पोलिस स्टेशन गाठले. तेथील अधिकार्‍यांशी चर्चा करून ते निघून गेले. आज गाडीचा पंचनामा व गाडीत असलेल्या कागदपत्रांची तपासणी करून पोलिसांनी गाडी दिली असल्याचे सुरेश पठारे यांनी सांगितले. 

Leave a Comment