…तर नक्षलवाद्यांवर कठोर कारवाईची गरज – अण्णा हजारे

नागपूर- नक्षलवादाची समस्या ही सामोपचाराने आणि चर्चेने सुटायला हवी. मात्र, जर नक्षलवादी ऐकणार नसतील आणि निरपराध व्यक्तींचे बळी घेत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी, असे स्पष्ट मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
    नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात बोलताना नक्षलवादाची समस्या हाताळण्यात सरकारने चूक केली, अशी टीका करीत आतातरी विचारपूर्वक मार्ग काढावा अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. आज तरी नक्षलवादाची समस्या हाताळण्यासाठी लष्कराची गरज नाही. ते काही पाकिस्तानी किंवा इंग्लंडमधून आलेले दहशतवादी नाहीत. ते आपलेच भाऊबंद आहेत. त्यामुळे सुरुवातीला सामोपचारानेच हा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे ते म्हणाले.
    सत्ता बदलून भ्रष्टाचार थांबणार नाही त्यासाठी व्यवस्था बदलावी लागेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आजचे सरकार भ्रष्टाचारात कदाचित ग्रेज्युएशन करत असेल म्हणून ते बदलले तर उद्या बदलून आलेले सरकार भ्रष्टाचारात पीएचडी करणार नाही असे कशावरून? त्यामुळे व्यक्ती किंवा सरकार बदलून चालणार नाही, व्यवस्थाच बदलावी लागेल. असे असले तरी जर एखादे सरकार व्यवस्था बदलण्यास तयार नसेल तर तेही बदलावे लागेल. तेथे दयामाया दाखवता येणार नाही, असेही अण्णांनी स्पष्ट केले.
    सुमारे एक तास चाललेल्या पत्रकारांशी वार्तालाप या कार्यक्रमात अण्णांनी पत्रकारांना विविध प्रश्‍नांवर मनमोकळी उत्तरे दिली. यावेळी आपल्या भविष्यातील कार्यक्रमाची दिशाही त्यांनी स्पष्ट केली. महाराष्ट्रात पाण्याची समस्या गंभीर असून जलसंधारण असो की, पाणीपुरवठा योजना त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार बाहेर आणावा लागेल. त्यासाठी आपला महाराष्ट्र दौरा संपल्यावर या दौर्‍यात पाणी प्रश्‍नाच्या संदर्भात आमच्याजवळ आलेले पुरावे एकत्र करून सरकारला आम्ही जाब विचारू आणि त्यानंतर सरकारने समाधान केले नाही, तर आम्ही या मुद्यावर आंदोलन उभे करू असा इशारा त्यांनी दिला. हाती असलेले प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच नवे प्रकल्प जाहीर केले जातात. यात प्रकल्प वर्षानुवर्षे रेंगाळल्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढतो. ठराविक कंत्राटदारच हे काम करतात आणि त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन पैसा सर्व वाटून घेतात असा आरोपही अण्णांनी केला.
    जलसंधारणासोबत सहकार खात्यातही मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करीत सहकारी साखर कारखाने सहकार महर्षींनी डबघाईला आणले आणि विक्रीला काढले. तर मंत्र्यांनी ते विकत घेतले याकडे अण्णांनी लक्ष वेधले. असे डबघाईला आलेले आणि मंत्र्यानी कवडीमोल भावाने विकत घेतल्याप्रकरणीची माहिती आपल्याजवळ असून सरकारने यावर चौकशी केली नाही, तर आपण भंडाफोड करू असा इशाराही त्यांनी दिला.
    केंद्रातील १४ मंत्री भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणात अडकले आहेत याकडे लक्ष वेधत जर सीबीआय आणि दक्षता विभाग स्वायत्त असता, तर आज चिदंबरमसुद्धा तुरुंगात राहिले असते असा दावा त्यांनी केला. या मंत्र्यांना भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन खुलासा मागितला आहे. जर त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही तर देशभर जनआंदोलन उभे करू असेही अण्णांनी ठणकावले.
    भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही सुरू केलेल्या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही पाठिंबा नव्हता तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांची आपण कधी भेटही घेतली नाही त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याचा प्रश्‍नच उपस्थित होत नाही. तसेच त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहे असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.