राष्ट्रवादीचा श्वेत पत्रिकेस विरोध नव्हताच ˆ- तटकरे

पुणे, दि. १६ – राज्यातील जलसिंचनासंदर्भात श्‍वेतपत्रिका काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध नव्हताच, असे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ही श्‍वेतपत्रिका काढली जाईल, असा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला.
    जलसंपदा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्‍वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यावर अजितदादांनी जलसंपदा विभागाच्या कामकाजाची वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असल्याचा खुलासा करीत तटकरे यांनी श्‍वतपत्रिका काढण्यास पक्षाचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले.
    सुनील तटकरे म्हणाले, जलसंपदा विभागाच्या अहवालात राज्यातील सिंचनाचे क्षेत्र किती यासह सर्व माहिती उपलब्ध आहे. गेल्या १८ वर्षांत खोरेनिहाय किती प्रकल्प पूर्ण झाले, त्यासाठी किती खर्च झाला, पूर्ण झालेल्या प्रकल्पांतून किती जलसाठा तयार झाला, प्रत्यक्ष सिंचन किती झाले आणि कोणते प्रकल्प रेंगाळलेले आहेत याचा लेखाजोखा या अहवालामध्ये नमूद आहे. ही वस्तुस्थिती शेवतपत्रिकेमध्ये येणार असल्याने त्याला विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही.
    कोयना लेकटॅपिंग झाल्यानंतर १५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. लवादाने दिलेल्या निर्णयानुसार जलविद्युत प्रकल्पासाठी २५ टीएमसी जलसाठा करण्याची परवानगी मिळालेली आहे. यातून उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.