मावळ आंदोलनात गोळीबाराचे आदेश मी दिले नाहीत – संदीप कर्णिक

पुणे, दि. १६ – पवना बंद जलवाहिनी विरोधात पुकारलेल्या मावळ बंद आंदोलनाच्या दरम्यान काही पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी अश्रुधुर नळकांडया, रबरी राऊंड गोळीबार केला. या आंदोलनात मी गोळीबाराचे आदेश दिले नसल्याचे तत्कालीन पोलिस अधिक्षक संदीप कर्णिक यांनी बुधवारी न्यायालयात सांगितले.
    न्या. एम. जी. गायकवाड यांच्या मावळ गोळीबार चौकशी आयोगासमोर ते साक्ष देत होते. पोलिसांचे वकील सुरेश भोसले यांनी त्यांचे शपथपत्र न्यायालयात सादर केले. शेतकरी व आंदोलकांचे वकील विनायक अभ्यंकर व सुरेशकुमार पिसे यांनी त्यांची उलटतपासणी घेतली. यावेळी कर्णिक म्हणाले, मावळ आंदोलनात पोलिस गोळीबारात तीन मृत्यूमुखी तर ११ आंदोलक जखमी झाले. जखमींपैकी पाच लोकांना कमरेच्या वरच्या भागावर गोळ्या लागल्या. लाठीचार्जनंतर त्वरीत गोळीबाराचे आदेश दिले गेले. त्यात मोरेश्‍वर साठे या आंदोलकाचा मृत्यू झाल्याने जमाव प्रक्षुब्ध झाला हे म्हणणे खरे नाही. पोलिस चित्रिकरण फितीत मोरेश्‍वर साठे व कांता ठाकर या मृत आंदोलकांचे चित्रिकरण करण्यात आल्याचे आढळत नाही. मृत आंदोलक कोणत्या पोलिसांच्या गोळीने मृत झाले याबद्दलची माहिती अथवा शवविच्छेदनाचा अहवाल पाहिलेला नाही. आंदोलकांच्या मृत्यूची माहिती घेणे माझ्या कर्तव्याचा भाग नसल्याने सहकार्‍यांकडून याबाबत मी कोणतीही माहिती घेतली नाही. घटनास्थळावर माझ्या आदेशान्वये पाच अश्रुधूर नळकांडया फोडल्या आहेत. पण त्यानंतर ज्या नळकांडया फोडल्या गेल्या त्याबाबत मी आदेश दिला नव्हता. पोलिस बळाचा वापर केल्याची माहिती पोलिस मुख्यालयात वायरलेसने कळवले नसल्याचे त्यांनी सांगितले. मी पोलिस अधिक्षक पदावर कार्यरत असताना स्वतःच्या नावावर शस्त्र घेतले नसल्याने आंदोलनाच्यावेळी अंगरक्षक व सीआरपीएफ जवानांच्या पिस्तुलातून पाच राऊंड फायर केले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी व राजकारणी यांच्यात असंतोष असल्याचा आरोप त्यांनी यावेळी फेटाळला.