पुणे, दि. १६ – पिंपरी रेल्वे स्टेशन मास्तर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचारी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे पुणे- मुंबई रेल्वे वाहतूक दुपारच्या सुमारास काही काळ ठप्प झाली होती. कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर रेल्वेसेवा पूर्ववत सुरू झाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे, बुधवारी पहाटे चारच्या सुमारास काही अज्ञात तरुणांचे टोळके पिंपरी रेल्वे स्टेशनवर आरडाओरडा करत होते. त्यावेळी रेल्वे स्टेशन मास्तर राजेंद्र प्रसाद गुप्ता यांनी त्यांना हटकले. त्यावरून संबंधित तरुणांनी गुप्ता यांना त्यांच्या केबिनबाहेर खेचून त्यांच्याच टेबलावरील स्टीलच्या फूटपट्टीने मारहाण केली. त्यात गुप्ता जखमी झाले. सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना पुण्यातील रेल्वे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या मारहाणीच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचारी संघटनेने काहीकाळ काम बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे पुणे-मुंबई वाहतूक ठप्प झाली होती. यामध्ये पुणे ते लोणावळा दरम्यान धावणार्या लोकल काही वेळ दोन्ही बाजुला खोळंबल्या होत्या. तसेच आंदोलनाचा फटका उजैन एक्सप्रेस आणि डेक्कन क्विनच्या प्रवाशांनाही बसला. जीआरपीने संबंधीत आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनामुळे साधारणतः एक तास रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंग यांनी दिली.