सौरभ गांगुलीची सुट्टी की नारळ?

    पुणे वॉरियर्सचा कर्णधार म्हणून सौरभ गांगुली अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याने रॉयल चॅलेंजर्सच्या सोबतच्या होमग्राऊंडवर होत असलेल्या सामन्यात सुट्टीचे कारण पुढे करीत खेळला नाही. या सामन्यात पुणे संघाचे नेतृत्व स्मितने केले. सौरभ जरी या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी मिळावी म्हणून सुट्टी घेत असल्याचे कारण सांगत असला तरी खरे कारण वेगळेच आहे.
    युवराज सिंगच्या आजारापणामुळे केवळ पश्‍चिम बंगालचा खेळाडू असल्याच्या कारणाने सौरभला गेल्या सिझनमध्ये पुणे संघाचा ‘सहारा’ मिळाला. त्यानंतर यावेळेस युवराजच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण या मिळालेल्या  संधीचे सोने दादाला करता आले नाही. निवृत्तीपासूनच्या फरफटीतून दादाला डोकेच वर काढता आले नाही. सुरुवातीच्या तीन सिझनमध्ये कोलकाता संघातून खेळताना कर्णधारपद भूषविलेल्या दादाला पहिल्या मोसमानंतर कर्णधारपद, तर तिसर्‍या मोसमाच्या संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर पुणे संघांतून तर नावाला साजेशी खेळी दादा करून मैदानावर ‘दादागिरी’ करेल, असे वाटत होते.
    निवृत्तीनंतर दादाला खर्‍या अर्थाने नूरच गवसला नाही. फलंदाजी अथवा गोलंदाजीत सातत्य नसल्याने तो संघासाठी ओझेच असल्याचे वाटत होते. त्यामुळे सहारा व्यवस्थापनाने आता पुढील सामन्यातून सुट्टीच्या नावाखाली दादाला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. एवढेच नव्हे तर पुढच्या सीझनपासून पुणे संघाचा ट्रेनर म्हणून राहण्याची विनंती केली असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात दादा पुणे संघाचा ट्रेनर म्हणून काम करणार की दुसर्‍या संघाचा आसरा घेणार हे लवकरच समजून येईल.

Leave a Comment