
पंढरपूर, दि. १६ – करोळे गावचा तलाठी दिलीप सरवदे याला ७/१२ उतार्यावर नाव लावण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले व पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
या घटनेची शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, करोळे येथील शेतकरी भिवाजी शिंगटे व अंकुश शिंगटे यांच्या जमिनीच्या ७/१२ वर नोंद करण्यासाठी तलाठी सरवदे यांनी भिवाजी यांच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची माहिती शिंगटे यांनी सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.
तलाठी सरवदे यांनी ही लाच पंढरपूर येथे देण्यात यावी, असे संबंधीतांना सांगितले. त्यावरून सापळा रचून सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास लिंक रोडवरील नागालँड हॉटेलजवळ तलाठी दिलीप सरवदे यांना १० हजार रुपयांची लाच घेत असताना पकडण्यात आले. लाचलुचपत विभागाचे उप अधीक्षक शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ही कारवाई केली.