येडियुरप्पा यांच्या निवासस्थानांवर सीबीआयचे छापे

बंगलोर दि.१६- बेकायदा खाण प्रकरणी सध्या चौकशी सुरू असलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या बंगलोर व शिमोगा येथील निवासस्थानांवर सीबीआयने आज सकाळी छापे टाकले. येडियुरप्पा यांचे मुलगे व जावई यांच्या घरावरही छापे घालण्यात आले असून सर्व छापे एकचवेळी घालण्यात आल्याचे समजते. या छाप्यात येडियुरप्पा यांच्याविरूद्धचे काही पुरावे सीबीआयच्या हाती लागल्याचेही सांगण्यात येत आहे.
   बेकायदा खाण प्रकरणात अन्य तिघांविरूद्ध गुन्हा नोंदवितानाच हे छापा सत्र पार पाडण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यातच येडियुरूप्पा यांच्याविरोधात सीबीआयने तपास करावा असे आदेश दिले होते. सीबीआयने त्यांच्या तपासाचा अहवाल ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयाला सादर करावयाचा आहे.