प्लॅस्टिक पिशवी अणुबॉम्बपेक्षा घातक

    सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याचा निकाल देताना, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कॅरीबॅग अणुबॉम्बपेक्षा घातक आहेत असे उद्गार काढले आहेत. आपल्या जीवनामध्ये प्लॅस्टिकचा किती मोठा धोका उद्भवला आहे याची कदाचित आपल्याला कल्पना नसेल, म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एस. सिंघवी आणि एस. जे. मुखोपाध्याय या दोघांनी या संबंधात निकाल देताना अतीशय समर्पक शब्दांमध्ये ही कल्पना दिली असून, धोक्याचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात आणून दिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाला या प्रश्‍नामध्ये लक्ष घालण्यास एक जनहित याचिका कारणीभूत ठरली. आंध्र प्रदेशातल्या दोन स्वयंसेवी संघटनांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. आंध्र प्रदेशामध्ये दोन गायींच्या शरीरातून शस्त्रक्रिया करून ६० किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या काढण्यात आल्या. या प्रकाराचे निमित्त करून या संस्थांनी या याचिका दाखल केल्या होत्या. विविध शहरातल्या नगरपालिका प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात अयशस्वी ठरल्या असल्यामुळे नगरपालिकांच्या हद्दीत सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापराला बंदी घालण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
    सध्या सगळीकडे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे साम्राज्य पसरले आहे आणि त्यामुळे गायी-म्हशींच्या खाण्यामध्ये या पिशव्या येतात आणि त्यांच्या पोटात जातात. त्यांचे परिणाम गायी-म्हशींच्या शरीरावर तर होतातच; पण त्यांच्या दूधांमधून मानवी शरीरात सुद्धा हे परिणाम पोचू शकतात असे या याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणून दिलेले होते. त्यांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापराचा व्यापक दुष्परिणाम न्यायालयाच्या समोर ठेवला तेव्हा या न्यायमूर्तींनी प्लॅस्टिकच्या पिशव्या अणुबॉम्बपेक्षा अधिक घातक आहेत असे उद्गार काढले. जे यथार्थ आहेत आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देणारे आहेत. गेल्या
    वर्षाभरात जगबुडीची दोन भाकिते केली गेली,  आणि ती चुकीची निघाली. ही पृथ्वी किंवा जग नष्ट होत नसते. मात्र या पृथ्वीवरचा मानव प्राणी नष्ट होऊ शकतो. तो नजिकच्या काळात नष्ट होणारच असेल तर केवळ प्लॅस्टिकमुळे नष्ट होईल, एवढे हे प्लॅस्टिकचे संकट गंभीर स्वरूपाचे आणि सर्वविनाशी आहे. प्लॅस्टिकचा शोध या मानवानेच लावला पण ते त्याच्या इतके जीवावर उठेल असे त्यालाही वाटले नसेल.
    विशेषत: माहिती आणि संपर्क क्रांती झाल्यापासून आणि कॅरीबॅगचा जमाना आल्यापासून प्लस्टिकचा फास मानवाच्या गळ्याभोवती आवळला जात आहे. मानवाने प्लॅस्टीकचा शोध त्याने सोयीसाठी लावला पण आता प्लॅस्टिकने त्याची गैरसोय केली आहे. ते टिकावू असल्याने त्याचा वापर वाढला पण ते कुजत नाही आणि विघटितही होत नाही, त्यामुळे प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर संपताच त्या जमेल तिथे फेकून दिल्या जातात आणि त्यांचे कधीही न संपणारे ढीग जमा होत जातात. गेल्या दहा वर्षांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि छोटी पाकिटे यांनी हा धोका अधिक गंभीर करून टाकला आहे. भारतात दररोज १ कोटी पाण्याच्या बाटल्या त्यातले पाणी पिऊन फेकल्या जातात, तर १० कोटी छोटी पाकिटे जमेल तिथे फेकून दिली जातात. त्यांचे पुन्हा काहीच होत नाही. ही पाकिटे आणि बाटल्या कुजत नाहीत, नासत नाहीत. आहे त्या अवस्थेत पडेल तिथे पडून राहतात. अशा या प्लॅस्टिकने पृथ्वीवरची जागा व्यापायला सुरूवात केली तर मानवाला पृथ्वीवर पाय ठेवायला जागा राहणार नाही. जागा मोकळी करण्यासाठी प्लॅस्टिक ढीग कोठे ठेवावेत असा प्रश्‍न निर्माण होईल. सारी पृथ्वी प्लॅस्टिकच्या कचर्‍याने व्यापली जाईल. प्लॅस्टिकने असा हा जागेचाच प्रश्‍न निर्माण होईल असे नाही. माणसाच्या आरोग्याचे आणि प्रदूषणाचेही यापेक्षा गंभीर प्रश्‍न प्लॅस्टिकने निर्माण केले आहेत आणि आणखी निर्माण होत आहेत.
    या प्रश्‍नातून मार्ग काढणे माणसाला शक्य होणार नाही. आता आपण कोणत्याही शहरातून फेरफटका मारला तर जागोजाग कॅरीबॅग, निरनिराळ्या पॅकिंगसाठी वापरलेले विविध प्रकारचे प्लॅस्टिक, वापरून टाकलेल्या पेन, संगणक, टेप, सीडीज, गुटख्याचे सॅचेटस् यांचे ढीग दिसायला लागतात. रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांत, गटारीत, कचर्‍याच्या कुंड्यांच्या आसपास, अनेक हॉटेलांच्या तसेच हॉस्टेल्सच्या पिछाडीला या प्लॅस्टिकच्या ढिगांचे अत्यंत किळसवाणे दृष्य पहायला मिळते. रेल्वे स्थानक, बसस्टॅन्ड, पर्यटनाची ठिकाणे अशा ठिकाणीही हेच दृष्य दिसते. हा न कुजणारा कचरा उचलणे हे नगरपालिका आणि महानगर पालिकांचे काम असते पण या संस्थांतले सफाई कर्मचारी हा कचरा उचलण्याचे साफ नाकारतात. अगदी वरवरचा कचरा उचलून ते नेतात. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आजकाल आपल्या देशातल्या सुगृहिणी घरातले शिळे, खरकटे प्लॅस्टिकच्या पिशव्यात घालून त्या पिशव्या आपल्या घरासमोर रस्त्याच्या कडेला टाकून द्यायला लागल्या आहेत. म्हणजे न कुजणार्‍या पिशव्याच केवळ पडलेल्या आहेत असे नाही तर त्यांच्या सोबत हे अन्नही आहे. त्यातून काय होत असेल याची कल्पनाही येणार नाही.

Leave a Comment