छोटा शकील आणि टायगर मेमनवर अमेरिकेची बंदी

वॉशिंग्टन दि.१६- कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या टोळीतील त्याचे जवळचे सहकारी छोटा शकील आणि इब्राहिम टायगर मेमन यांच्यावर अमेरिकेने बंदी घातली आहे. अमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण असलेल्या या दोघांचे आर्थिक जाळे नष्ट करण्याचा मनसुबा अमेरिकेने जाहीर केला असून तशा नोटीसाही या दोघांना जारी करण्यात आल्या आहेत.
   अमेरिकन सरकारच्या फॉरेन अॅसेट कंट्रोल विभागाने शकील आणि मेमनला अमली पदार्थ तस्कर म्हणून घोषित केले असून दाऊद टोळीतील त्यांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकन प्रशासनाने छोटा शकील हा दाऊदचा उजवा हात असल्याचे व दाऊद कंपनी आणि अन्य गुन्हेगारी संघटनांतील दहशतवादी यांच्यात मध्यस्थी करत असल्याचे सांगतानाच मेमन हा दाऊदचा अतिजवळचा मित्र असल्याचेही नमूद केले आहे. मेमन दाऊद गँगचा आशियातील सर्व व्याप सांभाळतो असे समजते.
  भारताला ९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दाऊद बरोबरच शकील आणि मेमन हवे आहेत. अमेरिकेने २००३ सालात दाऊदला ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित केले आहे व अमली पदार्थ तस्कर म्हणून त्याच्यावर २००६ पासून अमेरिकेत येण्यास बंदी घातली आहे.

Leave a Comment