बीबीए, बीसीए, बीबीएमची सीइटी रद्द, १२ वीच्या गुणांवर प्रवेश मिळणार

पुणे, दि. १४ – बारावी कॉमर्सनंतर बीकॉमच्या पर्यायाकडे वळण्यापेक्षा बीबीए, बीबीएम या मॅनेजमेंट कोर्सना प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांची क्रेझ अवघ्या पाच-सात वर्षांत कमी झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी बीबीए, बीसीए, बीबीएम प्रवेशासाठी यंदा सामाईक प्रवेश परीक्षाच (सीईटी) रद्द करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला आहे.
    गेल्या वर्षी सीईटी अवघ्या काही दिवसांवर आली असताना विद्यार्थ्यांकडून अपेक्षित नावनोंदणीच न आल्याने आयत्या वेळी काही परीक्षा केंद्रे रद्द करण्याची वेळ आली होती. या पार्श्‍वभूमीवर यंदा सीईटी रद्द करत थेट बारावीच्या मार्कांवरच आता विद्यार्थ्यांना या कोर्सना प्रवेश मिळणार आहे, असे विद्यापीठाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.  
    पुणे विद्यापीठाशी संलग्न पदवी कॉलेजांमध्ये २००५ मध्ये सुरू झालेल्या बीबीए, बीसीए, बीबीएम कोर्सना पहिली तीन-चार वर्षे चांगली मागणी होती. बीबीए केल्यावर थेट एमबीएला प्रवेश मिळेल अशीही एक समजूत सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मनात होती. दुसरीकडे या कोर्सना विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता असल्याने बीकॉमच्या तुलनेत फीमध्ये मोठी तफावत आहे. बीकॉम अभ्यासक्रम अवघ्या तीन-चार हजार रुपयांत होत असताना आज शहरातील बीबीए, बीसीए, बीबीएम कोर्सची फी ४० हजारांच्या घरात आहे. याचा थेट परिणाम या कोर्सच्या मागणीवर झाला.