गोवा क्रिकेट असोसिएशनवरून नार्वेकर यांना अखेर हटवले

पणजी, दि. १४ – गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांना रविवारी अखेर आपले पद सोडावे लागले. काल दुपारपासून सुरू असलेले त्यांच्या गच्छंतीचे नाट्य अखेर सायंकाळी संपले. स्वतःला किमान चार तास अध्यक्षाच्या केबिनमध्ये कोंडून घेतलेल्या नार्वेकर यांनी ७.३० वाजता स्वतःहून केबिन सोडली आणि नवे अध्यक्ष बाळू फडके व इतरांनी त्याचा ताबा घेतला.
स्वतः दयानंद नार्वेकर व इतरांनी चालविलेल्या गोवा क्रिकेट असोसिएशनमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पर्रीकर सरकारने आठ दिवसापूर्वीच द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. दरम्यानच्या काळात गोवा क्रिकेट असोसिएशनच्या १५ सदस्यीय कार्यकारिणीपैकी ११ जणांनी नार्वेकरांविरूद्ध बंड केले होते. यात बाळू फडके तसेच प्रसाद फातर्पेकर यांचाही समावेश होता. या ११ सदस्यांनी नार्वेकरांची जीसीएच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केल्याचे जाहीर केले होते. काल हे सदस्य जीसीएच्या कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी गेले असता नार्वेकर यांनी त्यांना प्रतिकार केला होता. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासातील ही महत्वपूर्ण घटना असून नार्वेकर यांची गोवा क्रिकेटमधील अनेक सत्ता तूर्तास अनेक वर्षानंतर संपुष्टात आली आहे.

Leave a Comment