अस्सल भारतीय बास्मतीला चीनचे दरवाजे उघडले

चंदिगढ दि.१५- हरियानातील बास्मतीचे कोठार समजल्या जाणार्‍या कर्नाल मधील तांदुळ उत्पादक यावर्षी विशेष खुषीत आहेत कारण चीनने भारतातील हा अस्सल बास्मती आयातीचे परवाने खुले केले आहेत. मात्र या सर्व उत्पादकांना चीनशी व्यापार करण्यात मुख्य अडचण आहे ती भाषेची. त्यामुळे हे व्यापारी चीनी भाषा समजू शकणार्‍या दुभाष्यांच्या शोधात आहेत असे समजते.
  इंडियन राईस एक्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष विजय सेठिया याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की गेली चार वर्षे आमची संघटना चीनमध्ये आपला तांदूळ निर्यात करण्याच्या प्रयत्नात होती. चीनच्या एका शिष्टमंडळाने कर्नाल येथील भात गिरण्यांना भेटी देऊन तांदळावर जादा किडनाशके, किटकनाशके, रसायने फवारली गेलेली नाहीत ना तसेच तांदूळ तयार करताना गिरण्या स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य आहेत ना याची पाहणी करून त्यांच्या सरकारला अनुकुल अहवाल दिला आहे. त्यामुळे यंदापासूनच तांदूळ निर्यात शक्य होणार आहे.
   संघटनेकडे चीनी भाषा येणारे दुभाषी नाहीत. त्यावर उपाय म्हणून सध्या चीनमध्ये ज्या भारतीय कंपन्या आहेत, मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या असोत, त्यांच्या मदतीनेच निर्यात केली जाणार आहे. सुरवातीला निर्यातीचे प्रमाण कमी असेल पण आवश्यक ते सर्व परवाने आल्यानंतर निर्यात वाढेल. चीनी लोकांना चिकट तांदूळ जास्त पसंत पडतो. पण भारतातील तांदळाचा भात सळसळीत मोकळा होतो. मात्र तरीही चीनकडून या तांदळाला मागणी आहे. गेली दीडदोन वर्षे इराणची निर्यात बंद झाली होती तीही यावर्षीपासून पुन्हा सुरू झाली आहे. आणि आता चीनलाही निर्यात होणार आहे यामुळे तांदूळ उत्पादक आनंदात आहेत.
  भारत आणि पाकिस्तान या दोन देशात मोठ्या प्रमाणावर बास्मती पिकविला जातो आणि दोन्ही देशांकडे या तांदळाचे पेटंटही आहे.

Leave a Comment