
इस्लामाबाद, दि. १२ – वीजटंचाईमुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तान सरकारने अखेरीस भारत, इराण आणि ताजिकिस्तान या देशांकडून वीज खरेदी करण्याचे ठरविले आहे. पाकिस्ताचे जल व विद्युत मंत्री सय्यद नवीद कमर यांनी पाकिस्तानच्या संसदेत ही माहिती दिली. पाकिस्तान एकूण २६०० मेगावॅट वीज आयात करणार असून, त्यात इराणकडून ११०० मेगावॅट, ताजिकिस्तानकडून १००० मेगावॅट आणि भारताकडून ५०० मेगावॅट वीजेची खरेदी केली जाणार असल्याचे कमर यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानात एकूण १० हजार मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते. तर त्यांची गरज मात्र १६ हजार मेगावॅट वीजेची आहे. याचा परिणाम म्हणून पाकिस्तानातील मोठ्या शहरांपासून गावांमध्ये रोज किमान १० ते १५ तासांचे भारनियमन केले जात आहे. परिणामी जनता त्रस्त झाली असून, देशभर सरकारविरोधात आंदोलने केली जात आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ शहबाज शरीफ मुख्यमंत्री असलेल्या पंजाब प्रांतात तर वीजटंचाईमुळे सर्वाधिक असंतोष आहे. स्वतः मुख्यमंत्रीच पाकिस्तान सरकारविरोधात आंदोलन करीत असल्याचे चित्र येथए पहावयास मिळत आहे. केंद्रात सत्ता असलेल्या पीपल्स पार्टीला पाठिंबा देणार्या मुस्लीम लीग (क्यू.) या पक्षाने तर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे अखेर जाग आलेल्या पाक सरकारने अखेर वीजेसाठी शेजारी देशांना साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सध्या इराणकडून ७२ मेगावॅट वीज आयात करीत असून, त्यात वाढ करणे. तसेच ताजिकिस्तान व भारताकडून अतिरिक्त वीज आयात करण्याचे धोरण पाकिस्तानने जाहीर केले आहे.