
मुंबई, दि. १५ – सार्वजनिक उद्योगातील बँक ऑफ बडोदाने ३१ मार्च २०१२ अखेर संपलेल्या वर्षात ५००६ कोटी ९६ लाख रूपयांचा निव्वळ नफा कमवून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्के वाढ साधली. बँकेला मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाही अखेरीस १५१८ कोटी १८ लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला. यात १७.३ टक्के वाढ झाली. निव्वळ व्याजापोटी वार्षिक १०३१७ कोटी एक लाख रूपयांचे उत्पन्न कमविले. तर तिमाही अखेरीस याचे प्रमाण २७९७ कोटी ४० लाख रूपये होते. बँकेने सहा लाख ७२ हजार २४८ कोटी रूपयांचा एकूण व्यवसाय केला. यात ३५.९ टक्के वाढ झाली. दोन लाख ८७ हजार ३७७ कोटी रूपयांची कर्जे दिली. यात २५.७ टक्के वाढ झाली. मार्चअखेरीस संपलेल्या तिमाही अखेरीस ९०१६ कोटी ३१ लाख रूपयांचे एकूण उत्पन्न मिळविले; तर २०५० कोटी ९३ लाख रूपयांचा ‘ऑपरेटिंग’ नफा झाला.
३१ मार्च २०१२ अखेरपर्यंत या बँकेचे २४ देशांत व्यवहार होते. गेल्या आर्थिक वर्षात या बँकेने युगांडा, केनया, संयुक्त अरब अमिराती व गयाना येथे नवीन शाखा उघडल्या. या बँकेची परदेशात ८९ कार्यालये आहेत. एकूण व्यवसायाच्या २८.२ टक्के हिस्सा परदेशी व्यवहारांचा आहे आणि ढोबळ नफ्याच्या २०.७ टक्के हिस्सा आहे. गेल्या वर्षी या बँकेला राष्ट्रीय व जागतिक पातळीवरून अनेक पुरस्कार मिळाले होते. द बँक ऑफ लंडनने ५०० बँकांची जागतिक पातळीवरची यादी जाहीर केली असून, या यादीत या बँकेला ४७ वा क्रमांक देण्यात आला आहे.