
नवी दिल्ली, दि. १५- टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील मुख्य आरोपी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्या. ओ. पी. सैनी यांनी मंगळवारी जामीन मंजूर केला. राजा यांना १.७६ लाख कोटी रूपयांच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबद्दल २ फेब्रुवारी २०११ रोजी केंद्रीय गुप्तचर विभागाने अटक केली होती. त्यानंतर १५ महिने ए. राजा हे दिल्लीच्या तिहार कारागृहात होते. ए. राजा यांना जामीन देण्यात आल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील १४ आरोपींपैकी १३ जणांना याआधीच जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र ए. राजा यांना जामीन मिळत नव्हता. बाकीच्यांना जामीन मंजूर केला जातो. मग आपणास का मंजूर केला जात नाही, असा युक्तिवाद ए. राजा यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. अखेर मंगळवारी राजा यांचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मंजूर केला. ए. राजा यांच्यावर २०० कोटी रूपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचे प्रकरण माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा यांच्यापेक्षा वेगळे आहे, असे सीबीआयकडून न्यायालयास सांगण्यात आले. या खटल्याच्या महत्वाच्या टप्प्यावर आरोपीस जामीनावर सोडल्यास त्यांच्याकडून साक्षीपुराव्यांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांना जामीन दिला जाऊ नये, असे सीबीआयकडून न्यायालयास सांगण्यात आले. मात्र न्यायालयाने ए. राजा यांच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करून मंगळवारी त्यांना जामीन दिला. माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा यांना सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात जामीन मंजूर केला होता.