येड्डींचा वेडेपणा…

    कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयूरप्पा आता कायम रुष्ट नेत्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यांनी अजून तरी भाजपाच्या बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केलेली नाही, पण ते तसे करणारच नाहीत याची काही खात्री देता येत नाही. त्याची पावले त्या दिशेने पडायला लागलीच आहेत कारण त्यांची मुराद पुरी होत नाही. अशाच प्रकारे इतरही राज्यांत काही भाजपा नेते ‘स्व’ च्या बाधेने बाहेर पडली आहेत. त्यांनी बाहेर पडताना, आपल्या जाण्याने पक्ष बुडेल असे दावे केले. काही ठिकाणी पक्षाचे नुकसान झाले हे खरे; पण काही ठिकाणी ते अजिबात न झाल्याने बाहेर पडलेल्या नेत्यांवर पश्‍चात्ताप करण्याची पाळी आली. त्यातले काही पक्षात परत आले. काही नेत्यांचा अहंकार आडवा आल्याने ते बाहेर राहिले. परत येऊन पक्षात स्थान मिळवण्याऐवजी त्यांनी बाहेर राहून आपला अहंकार कुरवाळत बसण्याचे तसेच राजकारणातून फेकले जाण्याचे पर्याय स्वीकारले. मध्य प्रदेशातल्या उमा भारती, उत्तर प्रदेशातले कल्याणसिंग, गुजरातेतले शंकरसिंग वाघेला, महाराष्ट्रातले अण्णा डांगे अशी ही मोठी मांदियाळी आहे. तिच्यात आता बी.एस. येडीयुरप्पा यांचा समावेश झाला आहे.   
    गंमतीचा भाग म्हणजे येडीयुरप्या यांनी आता बाहेर पडताना सोनिया गांधींचे गुणगान करायला सुरुवात केली आहे. अर्थात या वरून ते कॉंग्रेसमध्ये जाणार असा अंदाज काढता येणार नाही. कारण कॉंग्रेसच त्यांना आत घेणार नाही, ते त्यांना परवडणार नाही. दुसर्‍या बाजूला  भ्रष्टाचारात लिप्त झालेले असल्यामुळे भाजपाश्रेष्ठींनीही त्यांना दूर लोटायला सुरुवात केली आहे. आपल्या पक्षाने आपल्याला असे दूर लोटू नये, आपण कितीही आंधळा कारभार केला असला तरी आपल्याला सांभाळून घ्यावे असे त्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी आपल्या पक्षातल्या भ्रष्ट नेत्यांना अशा सांभाळून घेत असतात, असा त्यांचा दावा आहे. सोनिया गांधींप्रमाणेच भाजपाश्रेष्ठींनी सुद्धा आपल्याला पाठीशी घातले पाहिजे, अशी त्यांची भावना आहे. मात्र भाजपाचे नेते तसे करत नसल्यामुळे येडीयूरप्पासाठी भाजपा नेते निरुपयोगी ठरले आहेत. म्हणून ते जसजसे जास्त अडचणीत येत आहेत, तसतसे भाजपा नेत्यांवर आणि विशेषत: विद्यमान मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्यावर उखडायला लागले आहेत. काल त्यांनी सदानंद गौडा यांचा उल्लेख बेईमान  असा केला.
    बाहेरच्या लोकांना या शब्दाचा म्हणावा तसा बोध होणार नाही. कारण त्यांनी काय बेईमानी केली आहे हे सामान्य माणसांना माहीत नाही. येडीयूरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर सदानंद गौडा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. परंतु येडीयूरप्पा ही जागा खाली करायला तयार नव्हते. शेवटी सदानंद गौडा हे येडीयूरप्पा यांच्या ओंजळीने पाणी पितील आणि येत्या तीन-चार महिन्यांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडून येडीयूरप्पा यांना पुन्हा मुख्यमंत्री करतील, असे त्यांना खाजगीत आश्‍वासन देण्यात आले. म्हणून त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले. आता या घटनेला वर्ष उलटले तरी सदानंद गौडा जागा खाली करत नाहीत म्हणून येडीयूरप्पा यांच्यादृष्टीने सदानंद गौडा हे बेईमान ठरलेले आहेत. परंतु त्यांच्या या आरोपामध्ये फारसे तथ्य नाही. कारण मुख्यमंत्रीपद सोडल्या पासून ते भ्रष्टाचाराच्या आरोपात वरचेवर अडकत चाललेले आहेत. सत्ता माणसाला भ्रष्ट करते असे म्हणतात. येडीयूरप्पांनी ते सिद्धच करून दिलेले आहे. कर्नाटकातल्या लोखंडांच्या खाणींचे उत्खननाचे परवाने देण्याचा त्यांच्या हातातला अधिकार वापरताना त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. हे परवाने मिळविणार्‍या कंपन्यांनी येडीयूरप्पा यांच्या मुलांच्या शिक्षण संस्थेला करोडोंच्या देणग्या दिलेल्या आहेत.
    त्याशिवाय येडीयूरप्पा यांच्या मुलांना आणि कन्येला सरकारी जागा स्वस्तात देण्यात आल्या आहेत. या जागा नंतर या मुला-लेकीने खाजगीत विक्री करून करोडो रुपये कमवलेले आहेत. या भ्रष्टाचारातून ते मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्री करता कामा नये ही गोष्ट अगदी उघड आहे. अशा प्रकरणामध्ये सोनिया गांधी काय करतात याचा काही प्रश्‍नच नाही. परंतु सतेमुळे माणूस भ्रष्टही होतो आणि अविचारीही होतो हे सिद्ध करण्याचा त्यांनी जणू चंगच बांधलेला आहे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाचे काहीही होत असले तरी आपल्याला पुन्हा मु‘यमंत्री करावेच असा आग्रह धरायला सुरुवात केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपात गुंतलेले असू तर आपण शांत बसले पाहिजे आणि आरोपातून मुक्त होईपर्यंत पक्षामध्ये कसलीही गडबड करता कामा नये एवढे साधे तारतम्य त्यांना नाही. सदानंद गौडा यांच्या मंत्रिमंडळातल्या आपल्या मर्जीतल्या मंत्र्यांच्या साह्याने ते सदानंद गौडा यांना त्रस्त करत आहेत. त्यामुळे येडीयूरप्पा यांच्यावरचे आरोप काही कमी होणार नाहीत. उलट ते हास्यास्पद ठरतील आणि राज्यातली भारतीय जनता पार्टीची अवस्था सुद्धा वाईट होईल. परंतु येडीयूरप्पा सध्या, ‘हम भी डुबेंगे और पार्टी को लेकर डुबेंगे’ अशा मनस्थितीत आलेले आहेत. ज्यामध्ये कोणाचाच फायदा नाही. पण त्यांना हे कळत नाही.

Leave a Comment