मसालेदार फॉर्म्यूल्यांचा वापर

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये बड्या स्टार्सच्या मुलांनी पदार्पण करणे, ही नवीन गोष्ट नाही. या स्टार पुत्रांचे पदार्पणही शक्यतो लव्हस्टोरीमधूनच होत असते. निर्माता, दिग्दर्शक बोनी कपूरचा मुलगा अर्जुन आणि अभिनेत्री प्रियंकाची चुलत बहीण परिणिता ‘इशकजादे’ या चित्रपटातून पदार्पण करीत आहेत. अर्जुन होमप्रॉडक्शनच्या चित्रपटातून पदार्पण करत नाही एवढेच कायते वेगळेपण.
    ‘इशकजादे’ ही कथा आहे उत्तरप्रदेशातील अलमोर या मध्यम लोकवस्तीच्या शहरातील. चौहान आणि कुरेशी या दोन घराण्यांभोवती या शहराचे संपूर्ण राजकारण फिरते. या दोन कुटुंबामध्ये लहानसहान कारणावरून सतत भांडणे होत असतात. या दोन्ही परिवारांमध्ये दुश्मनी आहे. याच दुश्मनीच्या वातावरणात परमा (अर्जुन कपूर) आणि जोया (परिणिता चोप्रा) हे दोघे मोठे होतात. ते दोघेही परस्परांचा तिरस्कार करत असतात. दरम्यान, एका निवडणुकीच्या काळात परमा जोयाला प्रपोज करतो. जोया  सुरुवातीला नकार देते. नंतर मात्र दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात. निवडणूक  संपल्यानंतर तिला तो सोडून देतो. ती याचा बदला घेण्याचा निश्‍चय करते मात्र, दरम्यानच्या काळात दोघांच्याही घरात या नात्याला विरोध होतो, तर परमाची आई त्याला जोयाचा स्वीकार करायला सांगते. दोन्ही कुटुंबातील वैरभाव आणि बदल्याच्या आगीत परमा आणि जोया यांच्यातील प्रेमाला बर्‍याच अग्निदिव्यातून जावे लागते. त्यांचे प्रेम यशस्वी होते का, हे पहाण्यासाठी ‘इशकजादे’ पाहायला हवा.
    परमा आणि जोया दोघेही स्वभावाने एकदम बिन्धास आहेत. मनमानीपणा करणे, दुसर्‍याला कमी लेखणे, असे असंख्य गुण दोघांकडेही आहेत. यामुळेच जोयाने परमाला मारलेली एक चापट संपूर्ण चित्रपटाची कथा घडवून आणते. दोघांच्या स्वभावामुळे आणि कौटुंबिक कलहामुळे  चित्रपटामध्ये  रोमान्सबरोबरच ऍक्शनदेखील भरपूर आहे. सुरुवातीपासूनच गतिमान असलेला चित्रपट मध्यंतरानंतर आणखीनच  रोमांचक होतो. काही वेळेस कथा थोडी धिम्यागतीने चालली आहे, असे वाटते. त्यावेळी परमा आणि जोया यांच्यातील केमिस्ट्रीमुळे चित्रपट पुन्हा रोमांचक वळणावर येतो.
    एका संवेदनशील कथेला हबीब फैसल यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन लाभलंय. कलाकारांकडून अभिनयकरून घेण्यात ते यशस्वी ठरलेत. चित्रपटाच्या  यशासाठी आवश्यक असलेल्या सर्व फॉर्म्यूल्यांचा दिग्दर्शकाने पुरेपूर वापर केला आहे. नायक-नायिकेतील संघर्ष, प्रेम, राजकारण, भेदभाव या सर्वांचे दर्शन चित्रपटात घडते.
अर्जुन कपूर आणि परिणिता चोप्रा यांचे काम बघण्यासारखे आहे. अर्जुनचा हा पहिला सिनेमा असतानाही त्याने आत्मविश्‍वासाने भूमिका साकारली आहे. परिणिताने साकारलेली जोयाही अप्रतिम झाली आहे. गौहर खान हे देखील छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. चित्रपट नायक नायिकेभोवतीच फिरतो, त्यामुळे इतर कलाकारांना फारसा वाव मिळालेला नाही.
    ‘इशकजादे’ या कथेला पटकथेची उत्तम जोड मिळाली आहे. चित्रपटाच्या संवादावर उत्तर भारतात बोलल्या जाणार्‍या भाषेचा पूर्ण प्रभाव आहे. या प्रेमकथेला संगीताची साथही चांगली लाभली आहे. गाणी कथेला अनुरूप आल्याने चित्रपट गाण्यामधून पुढे सरकत जातो. छायांकन, संकलन या गोष्टीही उत्तम झाल्या आहेत. परिणिता चोप्रा आणि अर्जुन कपूर या दोघांतील सुरेख केमिस्ट्री आणि अभिनयतसेच चित्रपटाचा सुंदर शेवट यासाठी ‘इशकजादे’ पाहायला हरकत नाही.
चित्रपट- इशकजादे
निर्माता- आदित्यचोप्रा
दिग्दर्शक- हबीब फैसल
संगीत- अमित त्रिवेदी
कलाकार- अर्जुन कपूर, परिणिता चोप्रा

Leave a Comment