पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर होणार

 पुणे,  दि. १३ – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व-माध्यमिक (चौथी) शिष्यवृत्ती परीक्षेचा रविवारी जाहीर कऱण्यात येणारा निकाल काही तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. हा निकाल सोमवार, दि. १४ मे रोजी दुपारी ३ वाजता जाहीर होणार आहे.
    इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा दि. १८ मार्च रोजी पार पडली होती. या परीक्षेला राज्यभरातून ११ लाख १८ हजार ६६३ विद्यार्थी बसले होते. त्यातून सुमारे १६ हजार ६८३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे उपआयुक्त शिवाजी पांढरे यांनी दिली.
    दहा हजार लोकसंख्येच्या प्रमाणात ३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत असते. पुणे जिल्ह्यात मागील वर्षी निकालात १ हजार २५९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. ही शिष्यवृत्ती प्रति महिना १०० रुपये अशी तीन वर्षांकरिता दिली जाते. प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या आणि लोकसंख्येचे प्रमाण यावरुन तेथील गुणवत्ता यादी ठरविले जाते. त्यानुसार शिष्यवृत्ती धारकांची संख्या निश्‍चित केली जात असते, असेही परीक्षा परिषदेच्या कार्यलयाकडून सांगण्यात आले.
    दरम्यान या वर्षीच्या परीक्षेचे सर्व निकाल संकलित करण्यात आले आहेत. मात्र परिषदेच्या संकेतस्थळाचा सर्व्हर डाऊन झाल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी निकाल जाहीर होणार असल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात मोठी उत्सुकता होती. पण ऐनवेळी निकाल न लागल्याने सर्व विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.