पाण्यावर प्रत्येकाचा समान हक्क – डॉ. राजेंद्रसिंह

पुणे, दि. १४ – उपलब्ध पाण्यावर प्रत्येकाचा हक्क आहे. असे असतानाही गरीबांचे पाणी मात्र घेतले जाते आणि समाजातील उच्चवर्गीयांना पुरविले जाते हे चित्र काही समाधानकारक नाही, अशी टीका जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केली.
पुणे जिल्हा पाणी हक्क समितीच्या वतीने आयोजित केलेल्या पुणे जिल्हा पाणी परिषदेमध्ये ते बोलत होते. या परिषदेला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, कम्युनिस्ट पक्षाचे शहर शाखेचे सचिव अजित अभ्यंकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. सिंह पुढे म्हणाले की, देशातील कोणत्याही शहरात पूर्ण क्षमतेने नदी वाहत नाही. नाले मात्र भरभरुन वाहत आहेत हे चित्र कशाचे द्योतक आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक नदी ही पर्यावरणाच्यादृष्टीने सुरक्षित आहे का याचा विचार गांभीर्याने करायला हवा. शोषण, अतिक्रमण आणि प्रदूषण रोखण्यासाठी आपण संघटित व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, वरसगाव धरणातून तीन टीएमसी पाणी पळविले गेले हे वास्तव आहे. ते पाणी जर पुण्यासाठी उपलब्ध झाले असते तर पाण्याची टंचाई निर्माण झाली नसती. आज उजनी धरणाचे जे झाले तेच वरसगाव धरणाचे होणार का आणि खडकवासल्याच्या संदर्भातही त्याचीच पुनरावृत्ती होणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आज सर्वसामान्य जनतेत असंतोष पसरला आहे. खडकवासल्याच्या परिसरात नवीन शहरे निर्माण होत आहेत ती सर्व खडकवासल्याच्या पाण्यावर अवलंबून असणार आहे. म्हणून त्याचा परिणाम भविष्यात पुण्याच्या पाण्यावर होणार आहे.