दिल्लीसमोर किंग्जचे आवाहन

मुंबई, दि. १४ – बाद फेरीत प्रवेश निश्‍चित करण्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ मंगळवारी गुणतालिकेत अव्वल स्थानी असणार्‍या दिल्ली डेअरडेव्हिलशी फिरोजशाह कोटला येथे दोन हात करणार आहे.
    दिल्लीने आत्तापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये १८ गुणांची कमाई केली आहे. तर पंजाबने या स्पर्धेत थोड्या उशिरा सामने जिंकण्यास सुरूवात केली. त्यांचे काही सामने अटीतटीचेही झाले. परंतु, स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर त्यांना त्यांचे उरलेले तिन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. गेल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघाचे निकाल अनपेक्षित होते. दिल्लीची फलंदाजी ढेपाळल्याने चेन्नईने त्यांच्यावर सहज विजय मिळविला. तर कर्णधार डेव्हिड हसी आणि गुरप्रीत अहलुवालियाच्या खेळीच्या जोरावर पंजाबने शेवटच्या चेंडूवर विजय मिळविला.
    दिल्लीचा संघ हा संघाचे सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या फलंदाजीवर अवलंबून आहे. तर त्यांची मधली फळी म्हणावी तशी कामगिरी करू शकलेली नाही. फिरोजशहा कोटला मैदानाची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असून, चेंडूचा टप्पा चांगला राहणार आहे. दिल्लीचा मोर्नी मॉर्केल चांगली गोलंदाजी करत आहे. त्याला उमेश यादव आणि वरूण ऍरॉन यांची चांगली जोड मिळत आहे.

Leave a Comment