ईडन गार्डनवर सचिनचा सत्कार

कोलकाता, दि. १२ – आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमध्ये शतकांचे महाशतक करून ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित कऱणार्‍या विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा बंगाल क्रिकेट असोसिएशन्स आणि बंगाल राज्य शासनातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी त्याला अनेक मौल्यवान भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
    बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सचिनला सोन्याची बॅट आणि बॉल देऊन गौरविले. सोन्याइतक्याच मौल्यवान असलेल्या सचिनकरिता ही यथार्थ भेट आहे. त्याच्या कर्तुत्वाला आम्ही सलाम करतो, असे गौरवोद्गार यावेळी बॅनर्जी यांनी काढले. बंगालची सुप्रसिद्ध मिठाई संदेश आणि राजभोग सुद्धा सचिनला उपहार म्हणून देण्यात आले.
    हा गौरव समारंभ आपल्या डोळ्यात साठवू पाहणार्‍या ईडन गार्डनवरील चाहत्यांनी सचिनला उभे राहून मानवंदना देत टाळ्यांच्या गजरात स्टेडियम अक्षरशः दुमदुमून टाकले. सचिनला देण्यात आलेली संदेश मिठाईची बॅट आणि राजभोगचा चेंडू या भेटी सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरल्या. यावेळी सचिनने देखील आपल्या मिश्कील स्वभावाचा प्रत्यय सगळ्यांनाच दिला. आभारप्रदर्शनाची सुरूवात ..भालो आचि.. या बंगाली वाक्याने करीत सचिनने उपस्थित प्रेक्षकांना जिंकले. चाहत्यांनी केलेल्या निरातिशय प्रेमाबद्दलही सचिनने कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Comment