आयपीएलचा चेन्नईचा सामना दुसर्‍या जागी हस्तांतरीत करण्याबाबत चर्चा नाही – बीसीसीआय

चेन्नई, दि. १२ – चेन्नई येथे होणार्‍या आयपीएलच्या एलिमेनेटर सामन्यासंदर्भात जागा हस्तांतरणाच्या वादाला पेव फुटले होते. मात्र, आज चेन्नई येथे झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष एल. श्रीनिवासन यांच्या स्पष्टोक्तीनंतर वाद सध्यातरी शमला आहे असे वाटत आहे. या विषयावर आमची कोणतीही चर्चा झाली नाही असे ते पुढे म्हणाले.
    आयपीएलच्या अन्य ठिकाणी होणार्‍या सामन्यांमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, चेन्नई येथील स्टेडियममध्ये १२ हजार प्रेक्षक संख्या असलेले तीन स्टँन्ड तेथील महानगरपालिकेची परवानगी न मिळाल्याने रिकामेच आहेत. अजूनही आम्ही परवानगीसाठी वाट पहात आहोत, असे श्रीनिवासन म्हणाले.
    आयपीएलचा हा हंगाम जवळपास संपत आला आहे. यामधून होणारे नुकसान हा मुद्दा नसून चेन्नईच्या संघाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचा आज चेन्नईला शेवटचा सामना आहे.
    दरम्यान, श्रीलंकन प्रिमिअर लीगमध्ये भारतीय खेळाडूंना परवानगी देण्याबाबतचा प्रश्न विचारला असता, जर श्रीलंकेने आम्हाला तशा पध्दतीचा प्रस्ताव ठेवला तर आम्ही त्याबाबत विचार करु, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वेळेला काही कारणास्तव बीसीसीआयने या स्पर्धेला विरोध केला होता आणि आम्ही तसे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला कळविले होते. यावेळेला गेल्यावेळच्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची आम्हाला खात्री असल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले.

Leave a Comment