सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर, दि. १२ – सीमेपलीकडून मोठ्या शस्त्रसाठ्यासह काश्मीर खोरे मार्गाने भारतात घुसखोरी करू पाहणार्‍या सहा अतिरेक्यांना भारतीय लष्कराने ठार केले. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी परिसरात नियंत्रण रेषेनजीक गुरूवारी ही चकमक झडल्याचे लष्कराच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. यातील चार दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले असून, उर्वरीत दोन शवांचा शोध सुरू आहे.
    सीमेपलीकडून सुमारे ४० सशस्त्र दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करणार असल्याची सूचना गुप्तचर यंत्रणेकडून लष्कराला मिळाली होती. त्यानुसार या भागात दहशतवाद्यांना टिपण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. गुरूवारी दहशतवाद्यांची एक टोळी काश्मीर खोर्‍यात घुसखोरी करीत असल्याचे पाहताच भारतीय लष्कराने त्यांच्यांवर गोळीबार केला. या चकमकीत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालून त्यांचे मनसुबे हाणून पाडण्यात भारतीय लष्कराला मिळाले, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली.

Leave a Comment